नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील नामकरणाचा ठराव कागदावरच?

By वैभव गायकर | Published: August 15, 2023 01:19 PM2023-08-15T13:19:05+5:302023-08-15T13:19:51+5:30

एकनाथ शिंदे सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप

navi mumbai airport di ba patil naming resolution only on paper | नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील नामकरणाचा ठराव कागदावरच?

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील नामकरणाचा ठराव कागदावरच?

googlenewsNext

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव ठाकरे सरकारने पारित केला. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे- फडणवीस सरकारनेदेखील दि. बां. च्या नावाने ठराव नव्याने पारित केला. मात्र, या घडामोडीला एक वर्षाचा कार्यकाळ लोटला तरीदेखील त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे शिंदे सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करू लागले आहेत.

नवी मुंबईविमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाबाबतची माहिती भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी शासनाकडे माहिती अधिकारात मागविली होती. त्यावर उत्तर देताना राज्य माहिती अधिकारी लक्ष्मीकांत जाधव यांनी नामकरणाबाबत शासन स्तरावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

दि.बां.च्या नावासाठी प्रथमच ठाणे, रायगड आणि पालघर येथील स्थानिक एकवटून लाखोंच्या संख्येने मोर्चे, निदर्शने तसेच आंदोलने केल्यानंतर शासनास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाने स्वतंत्र ठराव करावा लागला होता. 

विमानतळाला हिंदू हृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोने पारित केल्यानंतर नामकरणाच्या वादाला सुरुवात झाली. या दरम्यान शिवसेना विरुद्ध प्रकल्पग्रस्त असा काही काळ संघर्षदेखील झाला. मात्र, शेवटी ठाकरे सरकारनेदेखील दि.बां.च्या नावावर ठराव करून या वादावर पडदा टाकला. मात्र, वर्षभराचा कालावधी लोटून याबाबत अंतिम निर्णय होत नसेल तर शोकांतिका असल्याचे मत सुशांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, विमानतळाच्या नावावरून याआधीही राजकारण तापलेले आहे. विमानतळाला दि.बां.चेच नाव द्यावे या भूमिकेवर येथील भूमिपुत्र ठाम असल्याचे सांगण्यात आले.

आमदार-खासदारांविषयी नाराजी

ठरावावर वर्षाचा कालावधी होऊनही अद्याप अंतिम निर्णय होत नसेल तर स्थानिक आमदार, खासदार याबाबत गप्प का ? त्यांनी याबाबत पाठपुरावा का केला नाही, असाही प्रश्न प्रकल्पग्रस्त उपस्थित करीत आहेत.

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

दि.बा.च्या नावाचा ठराव दोन्ही सभागृहात मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकरिता आमचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची पुढील आठवड्यात भेट घेणार आहोत. तसेच केंद्रीय पातळीवर याबाबत केंद्रीयमंत्री कपिल पाटील पाठपुरावा करणार आहेत. - दशरथ पाटील, अध्यक्ष, दि.बा. पाटील विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती.

दि. बां.च्या ठरावाला एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती शासन देते. मग तो होणार कधी ? शासनाने कायदेशीर प्रक्रिया करून लवकरात लवकर केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवावा. केवळ आश्वासनांवर प्रकल्पग्रस्तांची बोळवण करू नये. - सुशांत पाटील, अध्यक्ष, भूमिपुत्र फाउंडेशन.


 

Web Title: navi mumbai airport di ba patil naming resolution only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.