लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्य ठरावाला स्थगिती दिली होती, मात्र शनिवारी पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात ‘दिबां’च्या नावाचा ठराव मंजूर केल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. या निर्णयाची माहिती मिळताच लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २९ तारखेला हा ठराव मंजूर केला होता. तो वैध नसल्याचे सांगून त्याला शिंदे सरकारने स्थगिती दिली होती. त्यांच्या या निर्णयाविरोधात टीकेची झोड उठविण्यात आली. मात्र, या निर्णयाबाबत पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला होता.
इतर पदाधिकारी उपस्थित
शनिवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत तो ठराव पुन्हा मंजूर करून प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्रांसह सर्व समाजातील व्यक्तींचा सन्मान केला. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, गुलाब वझे, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, विनोद म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नव्याने ठराव मंजूर केल्याने आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो. ‘दिबां’च्या नावासाठी पुढे केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहोत. -दशरथ पाटील, अध्यक्ष, विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती
विमानतळाला ‘दिबां’चेच नाव लागले पाहिजे, यासाठी सर्व समाजातील लोक, प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिपुत्र एकसंध झाले. त्या अनुषंगाने भव्य आंदोलने झाली. या लढ्याला यश आले आहे. आम्हाला आनंद आहे की, राज्य सरकारने ‘दिबां’च्या नावाचा निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. - रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष, विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती
‘दिबां’च्या नामकरण आंदोलनामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला आहे. शनिवारी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे खरोखरच आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकालाच त्याचा आनंद वाटत आहे. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार असल्याने केंद्रामार्फतदेखील ‘दिबां’च्या नावाचा नक्कीच विचार केला जाईल, अशी आशा आहे. - सर्वेश तरे, आगरी कोळी साहित्यिक