नवी मुंबई विमानतळाच्या रडारला मिळाला ग्रीन सिग्नल; धाकले आयलंडवर यंत्रणा बसविण्यास केंद्राची अटी व शर्तींवर परवागनी
By नारायण जाधव | Published: February 20, 2024 09:01 AM2024-02-20T09:01:15+5:302024-02-20T09:01:44+5:30
कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर मार्च २०२५ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे.
नारायण जाधव
नवी मुंबई : कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर मार्च २०२५ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्यादृष्टीने या विमानतळावर ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी अत्यावश्यक असलेली बेलापूर शहाबाज जवळील पनवेल खाडीतील धाकले आयलंडवर निरीक्षण रडार यंत्रणा बसविण्यास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयानेही अटी व शर्तींवर परवागनी दिली आहे.
यानुसार यात बाधित होणाऱ्या खारफुटीचे नुकसान कमी करण्यासाठी रडार यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेला पुलांच्या स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये दोन खांबांचे अंतर २० मीटरवरून ३० मीटरपर्यंत वाढविण्याची सूचना केंद्राने केली आहे. तसेच विजेच्या बचतीसाठी रडार प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोलार पॅनल बसविण्यात येणार आहेत.
बिल्डरांसाठी धाकले आयलंडची निवड
सिडकोनेे पूर्वी एनआरआय कॉम्प्लेक्स मागील जागेची निवड केली होती. मात्र, यामुळे परिसरातील इमारतींच्या उंचीवर बंधने होती.
बिल्डरांच्या अंदाजे तीन हजार कोटींचे प्रकल्प अडचणीत आले होते. यामुळे त्यांच्या संघटनेने सिडकाेकडे रडारची जागा इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.
सिडकोची १७० हेक्टर विक्रीयोग्य जमीन धोक्यात येणार होती. हे टाळण्यासाठी धाकले आयलंडची निवड केली आहे.
वाहतुकीसाठी सोयीची जागा
धाकले आयलंड हे आयलंड पनवेल खाडीने वेढलेले आहे. बेलापूरची महागाव जेट्टी आणि सीवूड टर्मिनल येथून जवळच असून, येथून सहज ये-जा करता येणार आहे. परिसरात कोणतीही मानवी वस्ती आणि विकासकामे सुरू नाहीत. रडार यंत्रणा बसविण्यासाठी ०.५३१५ हेक्टर खारफुटीसह ६० झाडांची कत्तल करावी लागणार आहे.
प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवाशांची हाेणार ये-जा
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या देखरेखीखाली ही कामे केली जाणार आहेत. प्राधिकरणाच्या अंदाजानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे प्रवासी प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज आहे.
त्यानुसार विमानांचे किमान ३ नॉटिकल मैलावर उच्च तीव्रतेच्या धावपट्टीच्या ऑपरेशनसाठी रडार यंत्रणा बसविण्याची योजना आहे. यासाठी प्राधिकरणाने विमानांच्या चोख संचालनासाठी किमान ३ ठिकाणी विमानतळ सर्वेक्षण रडार प्रणाली बसविण्यासाठी योजना आखली आहे.