नवी मुंबई विमानतळ सेवेसाठी सज्ज; या तारखेपासून उड्डाणे सुरु करण्याचा विचार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 08:47 IST2025-02-28T08:47:20+5:302025-02-28T08:47:42+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विमानतळाचा विकास केला जात आहे. या प्रकल्पावर नोडल एजन्सी म्हणून सिडको काम करत आहेत.

नवी मुंबई विमानतळ सेवेसाठी सज्ज; या तारखेपासून उड्डाणे सुरु करण्याचा विचार...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : देशातील पहिले ग्रीन फिल्ड आतंरराष्ट्रीय विमानतळनवी मुंबईत उभारले जात आहे. सध्या विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यानुसार १७ एप्रिल रोजी विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले करण्याची योजना आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देत आढावा घेतला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विमानतळाचा विकास केला जात आहे. या प्रकल्पावर नोडल एजन्सी म्हणून सिडको काम करत आहेत. गेल्या वर्षभरात आवश्यक असलेल्या अनेक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
१७ एप्रिलपासून विमानतळ खुले करण्याची योजना
विमानाचे टेक ऑफ आणि लॅण्डिंगचीही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यानुसार १७ एप्रिलपासून नवी मुंबई विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले करण्याची योजना आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे संचालक फैज अहमद किडवई यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत विमानतळाच्या कामांचा दिवसभर आढावा घेतला.
यावेळी नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रादेशिक संचालक प्रकाश निकम, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल आदी उपस्थित होते.
व्यापक मूल्यमापन
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा नियामक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विमानतळाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले. विमानतळाच्या धावपट्टी, एप्रन, टॅक्सी वे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हॅंडलिंग सिस्टीम आदी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
निर्णायक टप्पा
आढावा घेण्यासाठी आलेल्यांसाठी मॉक चेक-इन प्रक्रिया राबविण्यात आली. या अंतर्गत डमी बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅग जारी करण्यात आले. त्यानंतर संयुक्त बैठकीत काही सुधारणा सूचित करण्यात आल्या. विमानतळ परिचालनाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आणि तितकाच निर्णायक टप्पा होता.