नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुखोईच्या उड्डाणाची लवकरच चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी सिडको आणि संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ‘लोकमत’ला दिली.
सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मंगळवारी प्रकल्पाचा पाहणी दौरा केल्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुखोईचे लँडिंग होईल, असे सुतोवाच केले होते. या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमान प्राधिकरणाकडे यापूर्वीच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने होकार दर्शविल्यास कोणत्याही क्षणी सुखाेईची लँडिंग चाचणी करणे शक्य असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा व्यावसायिक वापरासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत खुला करण्याचे सिडकोचे नियोजन आहे. सध्या धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून, टर्मिनल इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. त्यानुसार विमानतळाच्या परिचलनासाठी महत्त्वाची मानली जाणारी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम चाचणी ऑगस्ट महिन्यात यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
आता विमानतळावर प्रत्यक्ष विमानाचे लँडिंग केले जाणार आहे. त्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमान प्राधिकरणाची अनुमती आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच संबंधित विभागांना पत्रे पाठविली आहेत.
विमानतळाचे टप्पे
नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहेत. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे.
३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. या अंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे.
टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.