नवी मुंबई विमानातळ दिबांच्या नावाने ओळखले जाईल, गणेश नाईक यांची ग्वाही
By कमलाकर कांबळे | Published: June 24, 2024 08:39 PM2024-06-24T20:39:35+5:302024-06-24T20:39:50+5:30
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांसाठी दि. बा. पाटील यांनी केलेले काम अविस्मरणीय आहे. प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी त्यांनी संघर्ष कोणीही विसरणार नाही. ...
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांसाठी दि. बा. पाटील यांनी केलेले काम अविस्मरणीय आहे. प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी त्यांनी संघर्ष कोणीही विसरणार नाही. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर नामकरणावर शिक्कामोर्तब होईल. नवी मुंबई विमानतळ दि. बांच्याच नावाने संबोधले जाईल, असा ग्वाही व विश्वास ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबईत ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त घणसोलीतील हनुमान मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक यांनी दि. बा. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. तर कुकशेत येथे नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दि. बांना विनम्र अभिवादन केले. घणसोली येथे महाआरोग्य शिबिरासह अन्य विधायक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
यावेळी माजी नगरसेवक घनश्याम मढवी, लक्ष्मीकांत पाटील, माजी परिवहन समिती सभापती दिलीप म्हात्रे उपस्थित होते. श्री देवस्थान संस्था (गावकी ) घणसोली, कोकीळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई, लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरण समन्वय समिती, नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशन तसेच २९ गाव संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.