अखेर शिवसेना नरमली, नवी मुंबई विमानतळास दिबांचेच नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 08:25 AM2022-06-29T08:25:41+5:302022-06-29T08:28:28+5:30
मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्याची प्रकल्पग्रस्तांची माहिती...
नवी मुंबई/पनवेल : एकनाथ शिंदेंसह ३८ आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील सत्तासोपानाच्या लढाईत पिछाडीवर पडलेली शिवसेना अखेर नरमली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पाठिंबा दर्शविला आहे.
आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडील दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे कधीही स्वत:च्या नावासाठी आग्रही नव्हते. यामुळे नवी मुंबई विमानतळाबाबत वाद असेल, तर हा विषय संपवा, अशी सूचना मी तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती, मात्र ते ऐकायला तयार नव्हते, मला विश्वासात न घेताच त्यांनी सिडकोत ठराव घेतला. सभागृहात तो घेतला नव्हता. आता लवकरच विधिमंडळाच्या सभागृहात ठराव घेऊन दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचे प्रकल्पग्रस्तांनी बैठकीनंतर सांगितले.
नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने अनेकदा आंदोलने केली, मोर्चे काढले. गेल्या शुक्रवारीही दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडकोवर प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा काढला होता. बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी काही वर्षांपूर्वी केली हाेती, परंतु शिंदे यांच्या बंडातील हवा काढण्यासाठी आणि नवी मुंबई, रायगडमधील प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांनीच हा वाद सोडवून दि. बा. पाटील यांच्या नावास संमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.
भाजप नेत्यांना टाळले
सर्वपक्षीय कृती समितीत सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असला, तरी मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह एकही भाजप नेता उपस्थित नव्हता. हे नेते स्वत:हून गेले नाहीत, की मुख्यमंत्री ठाकरे यांनी सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना टाळले, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
यांची होती बैठकीला उपस्थिती
बैठकीस आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघ शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक एम. के. मढवी, सोमनाथ वास्कर यांच्यासह संजय तरे, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, काँग्रेसचे महेंद्र घरत, अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, सपाचे अनिल नाईक यांच्यासह रायगड व नवी मुंबई प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते.