नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाच्या कामाने वेग घेतला असून, डिसेंबर २०२४ पासून येथून पहिले विमानोड्डाण करण्याचा सिडकोचा मानस आहे. विमानतळाचे काम अदानी उद्योगसमूहाकडे गेल्यापासून तेथील सिव्हिल कामांसह डोंगरकताई आणि पाइलिंगसह फाउंडेशनचे काम जोमात सुरू आहे. या विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमानांसाठी टीटीसी औद्यागिक वसाहतीतील एचपीसीएल अर्थात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या डेपाेतून इंधनपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी तुर्भे ते विमानतळ अशी १०.४५२ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.
ही संपूर्ण इंधनवाहिनी सीआरझेड-२ क्षेत्रातून जाणार असून, त्यात खारफुटी बाधित होणार नसल्याने प्राधिकरणाने गेल्या वर्षीच ही वाहिनी टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. प्रस्तावित पाइपलाइन कार्बन स्टीलची राहणार असून, एचपीसीएलच्या तुर्भेतील डी.९९ भूखंडावरील प्लॅन्टपासून विमानतळावरील सामायिक इंधन स्टेशनपर्यंत ती टाकण्यात येणार आहे. ३२३ बाय ७ एमएमची ही पाइपलाइन १०.४५२ किलोमीटर लांबीची राहणार आहे.
लीकेज झाल्यास होणार कमी नुकसानही पाइपलाइन जमिनीखालून जाणार असून, त्यामुळे पर्यावरण, माती किंवा खारफुटीचे नुकसान होणार नाही. एखाद्यावेळेस लीकेज झाल्यास संभाव्य इंधनगळती एचपीसीएलच्या अत्याधुनिक यंत्रणेस त्याची त्वरित खबर मिळून ती लगेच थांबविता येणार असल्याने माती किंवा परिसरातील पर्यावरणाचे फारसे नुकसान होणार नाही, असे सांगण्यात आले.
ही काळजी घ्यावी लागणारपर्यावरण संवर्धनाचे सर्व नियमांचे पालन करून पाइपलाइन टाकावी लागणार आहे. परिसरातील शेतीसह माती, खाडीकिनारा यांना नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊन आणि त्या त्या प्राधिकरणांची परवानगी घेऊन एचपीसीएल कंपनीस ही पाइपलाइन टाकावी लागणार आहे.
सिव्हिलची १८ टक्के कामे पूर्णसध्या विमानतळाची सिव्हिलची १७.८५ टक्के कामे पूर्ण झाली असून, डाेंगरकताई आणि पाइलिंग आणि फाउंडेशनचे काम ५० टक्के झाले आहे. त्यावर सिडकोकडून वॉच ठेवण्यात येत आहे.