नवी मुंबई विमानतळाला आता जेएनपीटीतून मिळणार जेट इंधन
By नारायण जाधव | Published: June 26, 2024 06:38 AM2024-06-26T06:38:35+5:302024-06-26T06:39:19+5:30
२२ किमीची भूमिगत पाइपलाइन टाकणार : सीआरझेडची मंजुरी
नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : कोणत्याही परिस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा चंग विकासक अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी आणि सिडकोने बांधला असून त्या दृष्टीने विमानतळावरील विकासकामांनी वेग घेतला आहे.
यानुसारच विमानतळावर ये-जा करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जेट विमानांना लागणाऱ्या इंधनासाठी जवाहरलाल नेहरू बंदरातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ते विमानतळापर्यंत २२ किमीची भूमिगत पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. तिला सीआरझेड प्राधिकरणाने मंजुरी देऊन हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.
- धावपट्टी, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरसह टर्मिनल बिल्डिंगच्या कामांनी वेग घेतला आहे. याशिवाय मुंबई, नवी मुंबईसह पनवेल आणि पुण्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी विविध रस्ते, उड्डाणपूल आणि सागरी मार्गाची कामे जोमाने सुरू आहेत.
- या कामांबरोबरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानांना लागणाऱ्या हजारो लीटर जेट इंधनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकासक अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी आणि सिडकोने कंबर कसली आहे.
- जेएनपीटीतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे ३ स्टेशन ते विमानतळापर्यंत २२ किमीची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ते विमानतळापर्यंत २१.७ किमीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाने ४ जूनच्या सीआरझेड मंजुरी दिली.
अशी असेल जेट इंधन पाइपलाइन
ही पाइपलाइन २१.७ किमी राहणार असून ती जमिनीखाली १.२ मीटर खोलवर भूमिगत राहणार आहे. ती १४ डायमीटर बाय ०.२८१ जाडीची राहणार आहे. इंधन गळतीसह इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी या पाइपलाइनला स्कॉडा प्रणाली आणि कॅथोडिक प्रोटेक्शन सिस्टीम राहणार आहे.