नवी मुंबई विमानतळ उभे राहणार कमळाच्या आकारात; झहा हदीद यांची रचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 07:53 AM2021-06-14T07:53:10+5:302021-06-14T07:53:29+5:30
मुंबई विमानतळावरील भार हलका करण्यासाठी नवी मुंबईत विमानतळ उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नामांतराच्या वादावरून राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आले आहे. ते म्हणजे या विमानतळाची रचना. ‘जीव्हीके’ समूहाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत व्हिडिओ आराखड्यानुसार नवी मुंबई विमानतळाची रचना कमळाच्या आकारात केली जाणार आहे. ब्रिटिश वास्तुरचनाकार कंपनी झहा हदीदने त्याची डिझाइन तयार केली आहे.
मुंबई विमानतळावरील भार हलका करण्यासाठी नवी मुंबईत विमानतळ उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे या विमानतळाची रचना कशी असेल, याची उत्सुकता प्रत्येकाला होती. आराखड्यानुसार कमळाच्या आकारात उभारण्यात येणाऱ्या या विमानतळामध्ये एकमेकांशी जोडलेले ३ टर्मिनल असतील. मध्यावर सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स तयार केले जाईल. या विमानतळाला पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना प्रवेशद्वार असणार आहे. पश्चिमेकडून प्रवासी वाहतूक, तर पूर्वेकडून हवाई मालवाहतूक होईल. दोन समांतर धावपट्ट्यांमुळे उड्डाणांचे संचलन करण्यात अडथळे येणार नाहीत, अशी माहिती देण्यात आली.
हे हरित विमानतळ चार टप्प्यांत उभारले जाणार आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथून प्रतिवर्षी ९ कोटी प्रवाशांना सेवा देता येईल. या विमानतळावर ८८ चेक इन पॉइंट्स, २६ इमिग्रेशन डेस्क, २९ एरोब्रिज असतील. चालू आर्थिक वर्षात या विमानतळाचा पहिला टप्पा सुरू करण्याचे नियोजन होते; परंतु कोरोनाकाळात कामावर परिणाम झाल्याने मुहूर्त हुकण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
रस्ते आणि रेल्वेमार्गाशी जोडणी
nप्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
nविमानतळाला द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे आणि जलवाहतुकीशी थेट जोडता यावे, यादृष्टीने विशेष व्यवस्था केली जाईल.
nयेथे ९९ मार्गांचे मध्यवर्ती रेल्वे टर्मिनस उभारण्याचे नियोजन आहे.
nविमानतळ पूण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथून प्रतिवर्षी ९ कोटी प्रवाशांना सेवा देणे शक्य हाेणार आहे.