अक्षता म्हात्रेच्या हत्येचे दिल्लीत पडसाद
By नारायण जाधव | Published: July 15, 2024 03:20 PM2024-07-15T15:20:42+5:302024-07-15T15:22:38+5:30
पीडित कुटुंबाने अक्षता हिचा नवरा व सासरचे पैशांसाठी मारहाण व मानसिक छळ करत असल्याचे सांगितले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात तिच्या नवऱ्याची व सासरच्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. ती
नवी मुंबई : बेलापूर येथील विवाहिता अक्षता कुणाल म्हात्रे हिस शीळफाटा येथील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी चहातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून तिच्यासोबत अतिप्रसंग केला. शुद्ध आल्यानंतर तिच्या डोक्यावर दगडांनी वार करून तिची गळा दाबून हत्या केल्याच्या घटनेचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले आहेत. पीडित अक्षता म्हात्रे हिच्या कुटुंबियांना भेटून रविवारी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पीडित कुटुंबाने अक्षता हिचा नवरा व सासरचे पैशांसाठी मारहाण व मानसिक छळ करत असल्याचे सांगितले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात तिच्या नवऱ्याची व सासरच्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. ती पूर्ण करण्यासाठी काँग्रेस सर्व प्रयत्न करेल. पोलिस प्रशासन किंवा सरकारने कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा केला तर काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही लांबा यांनी यावेळी दिला.
पीडित कुटुंबाला जे काही सहकार्य लागेल व अक्षताला न्याय मिळून देण्यासाठी जी काही पावले उचलणे गरजेची आहेत ती जबाबदारी लांबा आणि सव्वालाखे यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्यावर सोपवली. यावेळी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या सरचिटणीस उज्ज्वला साळवे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रणित शेलार, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बनसोडे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमराव भोसले व काँग्रेसचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्षांना ठेवले अंधारात
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी पीडिता अक्षया म्हात्रे हिच्या कुटुंबियांची भेट घेतली असली, तरी यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक गैरहजर हाेते. याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, लांबा आणि सव्वालाखे यांनी पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भेट घेतली, ही चांगली गोष्ट आहे. पीडितेच्या मारेकऱ्यांना सजा व्हायलाच हवी. मात्र दोन्ही महिला नेत्यांच्या भेटीबाबत मला काहीही माहिती नव्हती. प्रदेश पातळीवरील वा स्थानिक संबंधित कुणी नेत्यांनीही याबाबत कल्पना दिली नव्हती.