Navi Mumbai: "त्या" खाद्यतेलात आढळली प्राण्यांची चरबी, गुन्हे शाखेने सप्टेंबरमध्ये केली होती कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: December 7, 2023 04:11 PM2023-12-07T16:11:04+5:302023-12-07T16:11:46+5:30
Navi Mumbai: गुन्हे शाखेने एपीएमसीत खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली होती. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यामध्ये प्राण्यांची चरबी असल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - गुन्हे शाखेने एपीएमसीत खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली होती. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यामध्ये प्राण्यांची चरबी असल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे. अनेक वर्षांपासून त्याठिकाणी हा कारखाना चालवून ब्रँडेड शेंगतेल, राईचे तेल यामध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ करून विकले जात होते. याप्रकरणी आठ जणांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एपीएमसी परिसरात खाद्यतेलात भेसळ चालत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या पथकाने ५ सप्टेंबरला गौतम ऍग्रो इंडिया खाद्यतेल पॅकिंग कंपनीवर छापा टाकला होता. यावेळी त्याठिकाणी काही कामगार पाम तेलात वेगवेगळे द्रव्य मिसळून शेंगदाणा तेल व राईचे तेल बनवताना आढळून आले होते. हे तेल नामांकित कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये भरून विक्रीसाठी पाठवले जात होते. तेल भेसळीसाठी त्याठिकाणी मोठमोठे टॅंक उभारून ते मशीनला जोडण्यात आले होते. तर भेसळयुक्त तेलाचा साठा करण्यासाठी गोडावून देखील तयार करण्यात आले होते.
या कारवाईनंतर तिथल्या वेगवेगळ्या तेलाचे नमुने चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला असता त्यामध्ये प्राण्यांची चरबी असल्याची धक्कादायब बाब समोर आली आहे. त्यावरून या भेसळयुक्त तेल विक्रीचा कारखाना चालवणाऱ्या व्यक्तीकडून अनेक वर्षांपासून नागरिकांच्या आरोग्याशी चालणारा खेळ उघड झाला आहे. त्यानुसार बुधवारी रात्री एपीएमसी पोलिस ठाण्यात विशाल गाला, खुशाल नागडा, निलेश राजगोर, सोहम शिंदे, दिनेश जोशी, विनोद गुप्ता, मदन व इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सूत्रधार गाला याच्याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नसून या रॅकेटमध्ये इतरही अनेकांचा समावेश असल्याची शक्यता असून अधिक तपास सुरु असल्याचे वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.
अहवालावरून तेलात भेसळ असल्याचे उघड होऊन गुन्हा दाखल झाल्याने संबंधितांना पोलिसांकडून लवकरच नोटीस बजावली जाणार आहे. परंतु लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करूनही त्यांची जामिनावर सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संबंधित सर्वांवर नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याची कलमे लावून कठोर कारवाईची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कारवाईत छापा टाकलेल्या ठिकाणावरून १ कोटी ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रिया सनफ्लॉवर, ईगल रिफाईंड ऑइल, केशव मस्टर्ड ऑइल, न्यू गौतम तरल, चेतन रिफाईंड सोयाबीन ऑइल, नटराज तीळ तेल, प्युअर गोल्ड, फॉर्च्युनर सण लाईट, चिराग डालडा, जेमिनी सण फ्लॉवर, सूर्या डिलक्स, बालाजी तील तेल, किचन किंग डालडा, सोना, सौराष्ट्र, गुजरात डिलक्स अशा अनेक कंपन्यांच्या नावांच्या तेल पाकिटांचा समावेश आहे.