नवी मुंबई: नेरूळ-जुईनगरदरम्यान लोकलच्या महिला डब्यात घुसून 2 डिसेंबर रोजी एका चोरट्याने ऋतूजा बोडके या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मोबाईल, पर्स आणि कानातील रिंगा खेचून तिला बाहेर ढकलून दिल्याची खळबळजनक घटना घडली होती. ऋतूजाला रेल्वेतून ढकलणा-या आरोपीला अखेर अटक करण्यात यश आलं आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी आज संतोष केकान नावाच्या तरूणाला या प्रकरणी अटक केली आहे. जुईनगर रेल्वेस्थानकात ही घटना घडली होती. रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या साह्याने आरोपीचा शोध घेतला.
आरोपी शहाड, ठाणे येथील राहिवासी आहे. घटनेच्या दिवशी त्याने मद्यपान केले होते. मानसरोवर स्थानकातून रेल्वेने जात असताना त्याने महिला डब्यात ऋतुजा एकटी बघून तिला लुटन्याच प्रयत्न केला. परंतु तिने विरोध केल्याने तिला रेल्वेतून खाली ढकलून पळ काढला. तपासादरम्यान त्याचा पत्ता मिळाल्याने त्या ठिकाणी पोलीस गेले होते. मात्र, तो हाती लागला नव्हता. अखेर तो शिळफाटा येथील लॉजमध्ये लपल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळली. त्यानुसार आज छापा टाकून त्याला अटक केल्याचे उपायुक्त समाधान पवार यांनी सांगितले.
या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होते. घटना घडली त्यावेळ डब्यामध्ये रेल्वे पोलीस अथवा होमगार्ड उपस्थित नसल्याचे उघडकीस आले होते. 2 डिसेंबर रोजी जुईनगर येथील ऋतूजा सीवूड स्थानकात रेल्वेत चढली. मुंबईच्या दिशेला जाणार्या डब्यात ती एकटीच होती. चोरटा नेरूळ येथे डब्यात चढला. त्याने ऋतूजाचा मोबाईल आणि पर्स हिसकवली. कानातील रिंगाही ओढण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत चोरट्याने रिंगा खेचत ऋतूजाला रेल्वेतून धक्का दिला. यावेळी रेल्वे जुईनगर स्थानकात प्रवेश करीत होती. रेल्वेचा वेग कमी झाल्याने खाली पडलेल्या ऋतूजाला फारशी गंभीर दुखापत झाली नाही. मात्र तिच्या डोक्याला लागले असल्याने तिच्यावर वाशीच्या एमजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले.