नवी मुंबई बनले प्रमुख शैक्षणिक हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:50 PM2020-08-13T23:50:22+5:302020-08-13T23:50:26+5:30
नवी मुंबईमध्ये दळणवळणाच्या सर्वोत्तम सुविधा आहेत. प्रत्येक शाळा व महाविद्यालयाला स्वतंत्र मैदान, सुसज्ज इमारत व इतर सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. यामुळे मुंबई, ठाणे या शहरांतून नवी मुंबईमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
- नामदेव मोरे
देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. केजी टू पीजीपर्यंत सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या संस्थांनी त्यांची केंद्रे शहरात सुरू केली आहेत. वैद्यकीय, व्यवस्थापन व इतर उच्च शिक्षणासाठी देशभरातील विद्यार्थी नवी मुंबईला पसंती देऊ लागले आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात झाडाखाली जमिनीवर रेघोट्या मारून नवी मुंबईमधील शैक्षणिक पर्वाला सुरुवात झाली. शिरवणे व इतर काही गावांमध्ये धुळापाटीची शाळा प्रसिद्ध होती. शंभर वर्षांच्या काळामध्ये अनेक परिवर्तन होत गेली व नवी मुंबईची ओळख प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून देशभर झाली. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाºया ५०० पेक्षा जास्त शाळा आहेत. राज्य बोर्डाप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळाही येथे सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये जवळपास साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चार वैद्यकीय महाविद्यालये, दंतवैद्यकीय, आयुर्वेदिक महाविद्यालये, दहा हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयेही शहरात आहेत. उच्च शिक्षणासाठी देशभरातील विद्यार्थी येत आहेत. कनिष्ठ ते पदव्युत्तर महाविद्यालयांमध्येही हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशातील सर्व प्रमुख शैक्षणिक संस्थांनी त्यांची केंदे्र येथे सुरू करण्यास पसंती दिली आहे.
नवी मुंबईमध्ये दळणवळणाच्या सर्वोत्तम सुविधा आहेत. प्रत्येक शाळा व महाविद्यालयाला स्वतंत्र मैदान, सुसज्ज इमारत व इतर सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. यामुळे मुंबई, ठाणे या शहरांतून नवी मुंबईमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बस चालविणाºयांपासून स्टेशनरी पुरविण्यापर्यंत अनेक व्यवसायांना गती मिळत आहे. प्रत्येक वर्षी हजारो पदवीधर, डॉक्टर, अभियंते, व्यवस्थापन तज्ज्ञ घडविणारे शहर म्हणूनही नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. टी. एस. चाणक्य ही मरिन क्षेत्रातील सर्र्वोत्तम संस्था, खारघरमध्ये फॅशन विश्वातील सर्वोत्तम निफ्ट संस्थेची कार्यालयेही आहेत.
सरकारी शाळांमध्येही आधुनिक शिक्षण
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्येही आधुनिक शिक्षण दिले जात आहे. देशभर सर्वत्र सरकारी शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत आहे. परंतु नवी मुंबईमधील विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महानगरपालिकेने डिजिटल क्लास रूम
सुरू केले आहेत.
सीबीएससी बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. प्रत्येक नोडमध्ये माध्यमिक शाळाही सुरू केल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू केल्या असून, मनपाच्या शाळांमध्ये ३० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी
शिक्षण घेत आहेत.
सर्वोत्तम भौतिक सुविधा : नवी मुंबई, पनवेल परिसरामधील शाळांमध्ये सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रत्येक शाळा व महाविद्यालयाला मैदान राखीव असलेले नवी मुंबई हे एकमेव शहर आहे. सिडकोने सर्व शाळांना मैदान उपलब्ध करून दिले आहे. इमारतींसाठी भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. बहुतांश सर्व शाळांनी सर्व सुविधा असलेल्या इमारती उभ्या केल्या आहेत. यामुळे शहराबाहेरूनही विद्यार्थी शिक्षणासाठी नवी मुंबईमध्ये येऊ लागलेत.