नवी मुंबई : देशातील पहिले सेप्टीक टँक मुक्त शहर व १०० टक्के घरांमध्ये शौचालय असणारे शहर होण्याच्या दृष्टीने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. झोपडपट्टी परिसरातही घरगुती शौचालयांची निर्मीती केली जात आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त ४२ सेप्टीक टँक असून त्या परिसरामध्येही मलनिस:रण वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरभर मलनिस:रण वाहिन्यांचे जाळे तयार केले आहे. ७ अत्याधुनीक मलनिस:रण केंद्राच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उद्योगांना व उद्यानांसाठी उपयोग केला जात आहे. सद्यस्थितीमध्ये दिघा व काही झोपडपट्टी परिसरामध्ये एकूण ४२ सेप्टीक टँक आहेत. त्या परिसरामध्येही मलनिस:रण वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत यादवनगरमध्ये २ दशलक्ष लिटर क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. दिघा परिसरात २९ कोटी रूपये खर्च करून मलनिस:रण वाहिन्या व मलउदंचन केद्र बांधण्याचे काम केले जाणार आहे.२०१५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ५७४४ कुटुंबे उघड्यावर शौचास जात असल्याचे निदर्शनास आले होते. उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने ४०६ सार्वजनीक शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये ४३४० सीट्स उपलब्ध आहेत. झोपडपट्टी परिसरामध्येही घरगती शौचालय उभारण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या अनुदानातून १६८२ घरांमध्ये घरगुती शौचालय बांधण्यात आले आहेत. शेल्टर असोसिएट्स पुणे यांच्या माध्यमातून ४०२४ वैयक्तीक व घरगुती शौचालय बांधणले आहेत. १०० टक्के घरांमध्ये शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर सेप्टीकमुक्त करण्यासाठी जलद कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत.