Belapur Building Collapses : नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये १० वर्षापूर्वीची इमारत कोसळल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. बेलापूरमध्ये शहाबाज गावात शनिवारी इंदिरा निवास ही बेकायदा अनधिकृत इमारत कोसळून तीन जणांचा बळी गेला तर दोनजण जखमी झाले. दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीमधील ५५ जण सुखरूप बाहेर पडले. एका रिक्षाचालकामुळे या ५५ जणांचा जीव वाचला आहे. रिक्षा चालकामुळे वेळीच सावधान केल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. इतरवेळी अपमानास्पद वागणूक देणाऱ्या रिक्षाचालकाचे आता जीव बचावलेले नागरिक आभार म्हणत आहेत. शहाबाज गावातील इंदिरा निवास ही इमारत दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत अचानक कोसळली. यात मोहम्मद मिराज, शफील अन्सारी आणि मिराज अन्सारी यांचा मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षाचालक आकाश बाबूच्या सतर्कतेमुळे या अपघातातून ५५ जण वाचले आहेत. इमारतीच्या तळमजल्यावरील हेअर सलूनमध्ये झोपणाराआकाश बाबू शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास आला होता. त्यावेळी त्याला पहिल्या मजल्यावरून जोरात खडखडाट ऐकू आला होता.
"हा सगळा प्रकार पाहून मी धावत जाऊन लोकांना उठवण्यास सुरुवात केली. इथले रहिवासी सुरुवातीला घर सोडण्यास तयार नव्हते. तळमजल्यावरील एका महिलेने माझा इशाराही धुडकावून लावला होता. काही मिनिटांनंतर, त्या महिलेचे कुटुंब बाहेर आले आणि त्यांनी इमारत कोसळलेली पाहिली. पहिल्या मजल्यावरील रहिवाशांनी माझ्या सल्ल्याचे पालन केले आणि ते पटकन बाहेर पडले. मी आरडाओरडा केल्यानंतर अनेक रहिवासी बाहेर निघून आले," असे आकाश बाबूने सांगितले.
दोन बहिणींच्या लग्नात झालेले कर्ज फेडण्यासाठी आणि उरलेल्या चौघांच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी आकाश बाबू रिक्षा चालवण्यासोबत दर रविवारी सलूनमध्ये काम करायचा. त्या दिवशी रविवारच्या कामासाठी तो सलूनमध्ये झोपला आणि ही घटना घडली. आधी माझ्या दारु पिण्याच्या सवयीमुळे इथले रहिवासी माझ्याशी बोलणे टाळायचे. आता त्यांनी माझे कौतुक करायला सुरुवात केली आहे," असे आकाश बाबू म्हटलं आहे.