नवी मुंबई : समुद्रात डिझेल तस्करीप्रकरणी कारवाई केलेल्या बोटींना आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यामध्ये एक बोट पूर्णपणे जळाली असून, दुसरी बोट अर्धवट जळाली आहे. दोन महिन्यांपासून सीबीडीतील पुलाखाली या दोन्ही बोट उभ्या होत्या. मोठ-मोठ्या जहाजांमधून काळ्या बाजाराने डिझेल मिळवून त्याची कमी दराने विक्री करून डिझेल तस्करी रॅकेट चालविणाऱ्यांवर गुन्हे शाखा पोलिसांनी १२ जानेवारीला कारवाई केली होती. या कारवाईत डिझेल तस्करीसाठी विशेष बनविलेल्या दोन बोट व त्यामधील सुमारे २१ हजार लिटर डिझेल जप्त केले होते. समुद्रात चालणाऱ्या डिझेल तस्करीच्या रॅकेटपैकी एकेक रॅकेट होते. त्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी त्यांच्या पथकासह समुद्रात सापळा रचून ही कारवाई केली होती. दोन्ही बोटी सीबीडी येथील जेट्टीलगत पुलाखाली उभ्या होत्या. त्यापैकी एका बोटीला बुधवारी आग लागली. काही वेळातच दुसऱ्या बोटीलाही आग लागली. अग्निशमन दलाने दोन तासात आग विझवली.आगीबाबत साशंकताया गुन्ह्यात अटक केलेले सर्वजण सध्या जामिनावर मुक्त आहेत. या बोटी सुमारे १५ ते २० लाख रुपये किमतीच्या असून, त्या मात्र पोलिसांच्याच ताब्यात होत्या. अचानक लागलेल्या या आगीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या दुर्घटनेची नोंद एनआरआय पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.अगोदरच वर्तवली होती धोक्याची शक्यताडिझेल साठा असलेल्या या बोटी पुलाखाली उभ्या न करण्यासंदर्भात जानेवारी महिन्यातच विशेष शाखा उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी पत्राद्वारे कळवले होते. ज्या ठिकाणी या दोन्ही बोट उभ्या करण्यात आल्या होत्या, त्याच ठिकाणी सागरी सुरक्षा पोलिसांची चौकी आहे. शिवाय खाडी पूलदेखील असल्याने डिझेलमुळे दुर्घटना घडल्यास मोठ्या नुकसानाची शक्यता त्यांनी वर्तवली होती.
डिझेल तस्करीतील बोटीला आग; गुन्हे शाखेने समुद्रात केली होती कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 8:58 AM