नवी मुंबई - जीएसटी आयुक्तांच्या रो हाऊसमध्ये घरफोडी
By सूर्यकांत वाघमारे | Published: July 2, 2023 07:12 PM2023-07-02T19:12:58+5:302023-07-02T19:13:09+5:30
घर बंद असताना घडला प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : चेन्नईच्या जीएसटी आयुक्तांच्या नेरुळ मधील रो हाऊसमध्ये घरफोडीची घटना घडली आहे. त्यांच्या पत्नी चेन्नईला गेल्याने घर बंद असताना हा प्रकार घडला आहे. यामध्ये तीन लाखाचा ऐवज चोरीला गेला असून नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेन्नईचे जीएसटी आयुक्त बिधान शर्मा यांच्या नेरुळ सेक्टर १७ येथील रो हाऊसमध्ये हि घटना घडली आहे. त्याठिकाणी त्यांची पत्नी कुमकुम ह्या त्याठिकाणी रहायला आहेत. काही दिवसांपूर्वी त्या पती व मुलांच्या भेटीसाठी चेन्नईला गेल्या होत्या. यादरम्यान त्यांचा रो हाऊस बंद होता. ३० जूनला सर्वजण नेरुळला येणार असल्याने त्यांनी मोलकरणीला फोन करून घर साफ करून ठेवण्यास सांगितले होते. यामुळे मोलकरीण त्याठिकाणी गेली असता घरातील साहित्य विस्कटलेले आढळून आले.
याबाबत तिने कळवले असता बिधान शर्मा यांनी नेरुळला येऊन घराची पाहणी केली. यामध्ये घरातील मोबाईल, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाखाचा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झाले. याप्रकरणी त्यांनी शनिवारी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.