नवी मुंबईकरांना प्रतीक्षा मेट्रोची !
By admin | Published: June 8, 2015 03:57 AM2015-06-08T03:57:19+5:302015-06-08T03:57:19+5:30
माहिती व तंत्रज्ञानाचे आधुनिक शहर म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या नवी मुंबईच्या लौकिकात आता मेट्रोची भर पडणार आहे.
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
माहिती व तंत्रज्ञानाचे आधुनिक शहर म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या नवी मुंबईच्या लौकिकात आता मेट्रोची भर पडणार आहे. जलदगती वाहतुकीचा सक्षम पर्याय म्हणून सिडकोने शहरात मेट्रोचे जाळे विनण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बेलापूर ते पेंधरदरम्यान ११ कि़मी़ लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. विविध कारणांमुळे संथगतीने सुरू असलेल्या या मार्गावर डिसेंबर २0१६पर्यंत प्रत्यक्ष मेट्रो धावेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर उद्योग-व्यवसायातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या घटकांचे प्रमाण वेगाने घटत असल्याने त्याचा अप्रत्यक्ष फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. विशेष म्हणजे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाच्या पार्श्वभूमीवर ही बाब शोभनीय नसल्याने सिडकोने पारंपरिक रस्ते वाहतुकीला सक्षम ठरणाऱ्या मेट्रो रेल्वेला पसंती दिली आहे. त्यानुसार १0६.४0 कि़मी़ लांबीचा मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तीन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
बेलापूर ते पेंधर या ११ कि़मी़च्या मार्गावर एकूण ११ स्थानके असणार आहेत. मात्र विविध कारणांमुळे हे काम रखडल्याने या प्रकल्पाचा खर्च १,९८५ कोटींवरून २,१११ कोटींवर गेला आहे. ही मेट्रोची सेवा प्रत्यक्ष २0१७ पर्यंत सुरू होईल असे सांगण्यात येते.
७0 टक्के काम पूर्ण
बेलापूर ते पेंधरदरम्यानच्या मार्गावर एकूण ११ स्थानके असणार आहेत. सीबीडी बेलापूर व पेंधर येथे टर्मिनल असणार आहेत. सध्या या मार्गाचे काम ७0 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे.
पाच मार्गिकांची आखणी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोचा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सध्या शहरात उपनगरीय रेल्वे आणि नागरी वाहतूक सेवा कार्यान्वित आहे. विमानतळामुळे या यंत्रणांवर ताण पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक नोड्स जोडण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी एकूण पाच मार्गिकांची आखणी करण्यात आली आहे. बेलापूर-तळोजा-खांदेश्वर व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या पहिल्या मार्गिकेची लांबी २३.४0 कि़मी़ इतकी आहे.
बेलापूर ते तळोजा, पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. उर्वरित एमआयडीसी ते खांदेश्वर दुसरा, तर पेंधर व एमआयडीसीला जोडणार तिसरा अशा तीन टप्प्यांची आखणी करण्यात आली.