नवी मुंबई : जाहिराती, होर्डिंग्ज, व्यावसायिक फलक आणि त्यापाठोपाठ उगवणारे राजकीय नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे वाढदिवस फलक यातून शहराचे विद्रूपीकरणच सुरू आहे. नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वारापासून सुरू असलेली जाहिरातबाजी आता गल्लीबोळांत पोहोचली आहे. दिघा ते घणसोली परिसरात अधिकृत आणि अनधिकृत जाहिरातींचे पेव फुटले आहे.
राजकीय नेत्यांच्या जाहिरातींपासून, डझनभर छायाचित्रांसह माहिती देणारे फलक अनेक महत्त्वाच्या मार्गांसह विविध इमारतींभोवती दिसतात. जाहिरात फलक हे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत असला, तरी बहुतांशवेळा परवानगी न घेताच फलकबाजी केली जाते. त्यामुळे महसूल बुडत आहे. शहराचे विद्रूपीकरणही मोठ्या प्रमाणात होत आहे. या शहरातील रेल्वे स्थानके, बस स्थानके, बस थांबे, महत्त्वाची सर्व ठिकाणे अनधिकृत, अधिकृत होर्डिंग्जमुळे अक्षरश: झाकोळून गेली आहेत. महापालिकेच्या परवाना विभागाची परवानगी न घेता जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात वारंवार कारवाई केली जाते, मात्र संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा पुन्हा फलक लावले जातात.
घणसोली रेल्वे स्टेशनजवळ, घणसोली डी मार्ट कॉर्नर, हावरे चौक, सेक्टर १ दर्गा परिसर, माजी सरपंच दगडू चाहू पाटील चौक, स्वातंत्र्य संग्राम चौक, रबाले रेल्वे भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार, गोठीवली सर्कल, नोसिल नाका, तळवली गावाजवळ रिलायन्स कॉलनीसमोरील एका झाडाला तर चक्क चायनीज हॉटेलचा जाहिरात फलक लावण्यात आलेला आहे. काही शिक्षण संस्थांचा अपवाद वगळता कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा कार्यकर्त्याने रीतसर परवानगी घेतली नसल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात येते.
येथे लागतात फलक ऐरोली – बस स्थानकाबाहेरील मुख्य ठिकाण, रेल्वे स्टेशन, दिवा कोळीवाडा सर्कल, सेक्टर ८ आणि ९ स्मशानभूमी परिसर, ऐरोली कोळीवाडा सेक्टर २०.दिघा – ठाणे-बेलापूर महामार्गावरील महापालिका तलाव, इलठण पाडा, गवते वाडी, रामनगर, ईश्वरनगर, मुकुंद कंपनी प्रवेशद्वार