नवी मुंबई - मंगळवारी सर्वत्र पेट्रोल पंपावर झुंबड उडाली असतानाच पेट्रोल नाकारल्याने वाहनधारक व पंप कर्मचारी यांच्यात हाणामारीची घटना समोर आली आहे. यामध्ये दुचाकीस्वाराने पंप कर्मचाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून हत्येचा प्रयत्न केला. मात्र याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात संबंधितांची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
हिट अँड रन कायद्याविरोधात अवजड वाहनांच्या चालकांनी सोमवारी अचानक बंद पुकारला. यामुळे पेट्रोलचा तुटवडा होण्याच्या भीतीने मंगळवारी सर्वत्र पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात काही ठिकाणी पेट्रोल संपल्याने पंप बंद करण्यात आले होते. याचदरम्यान मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास शिळफाटा मार्गावरील महापे येथील पेट्रोल पंपावर वाहनधारक व पंप कर्मचारी यांच्यात जबर हाणामारीची घटना घडली आहे. दुचाकीस्वाराला पेट्रोल नाकारल्याने वाद होऊन हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या वादात तरुणांचा गट व पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचा गट यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. त्या यामध्ये दुचाकीस्वाराने एका कर्मचाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्याच्या हत्येचा देखील प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. परंतु यासंदर्भात कोणतीही तक्रार नसल्याने गुन्हा दाखल नसल्याचे रबाळे एमआयडीसी पोलिसांकडून सांगण्यात आले.