नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबई शहराच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या सततच्या वीज लपंडावाविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये दोन-दोन दिवस वीज नसते. आता पावसाळा सुरू झाल्याने येत्या काळात विजेच्या तक्रारी आणखी वाढणार आहेत, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वाशी विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन दिले. पक्षाने केलेल्या मागण्यांवर निर्णय झाला नाही, तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
या मागण्यांमध्ये रबाळे सब-स्टेशनमधून निघणारे आउट गोईंग फिडरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, ऐरोली उपविभागास ‘विभागीय कार्यालय’ करून घणसोली शाखेस उपविभाग करावा; कारण, सध्या ऐरोली उपविभाग कार्यालयांतर्गत जवळपास दीड लाखाहून अधिक ग्राहक झाल्याने अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे ऐरोली उपविभाग कार्यालयास विभागीय कार्यालय केले आणि तेथे एक कार्यकारी अभियंता, मेंटेनन्ससाठी एक अतिरिक्त अभियंता असेल, स्टोर असेल तर ग्राहकांना किंवा अधिकाऱ्यांना ज्या गोष्टीसाठी वाशीला जावे लागते, ते काम ऐरोलीमध्येच सोयीनुसार होऊ शकेल.
तसेच घणसोली शाखेची विभागणी करून त्यात तीन शाखा कराव्यात, जेणेकरून ग्राहकांस उत्तम सुविधा मिळतील. ३ विभागांस ३ स्वतंत्र अतिरिक्त अभियंता मिळून प्रत्येक शाखेमध्ये कमीतकमी २० कर्मचारी उपलब्ध होतील, घणसोलीत नवे रोहित्र बसवावे, जुन्या फिडर पिलरच्या जागी नवीन फिडर पिलर बसवावेत आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी नगरसेवक अंकुश सोनवणे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रणीत शेलार, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमराव भोसले व सुनील किंद्रे, दिघा ब्लॉक अध्यक्ष बालाजी सावले, सुरेश मानवतकर, सूर्यकांत निवडुंगे, किरण म्हात्रे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.