नारायण जाधव, नवी मुंबई | लोकमत न्यूज नेटवर्क: सध्या संपूर्ण देशभरात महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना व जीवनाश्यक वस्तूंवर लादलेल्या जीएसटीच्या निषेधार्थ नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी वाशीच्या शिवाजी चौकात निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध केला.
राज्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी शेती पूर्णत: वाहून गेली आहे, कित्येक शेतीमध्ये नदी - नाल्यांचा गाळ साचल्याने ती खराब झाली आहे यामुळे शेतींवर भविष्यात कोणतीही पीके घेता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने देशपातळीवर शुक्रवारी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार नवी मुंबई जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा जाहीर निषेध करून आंदोलन करण्यात आले. त्यातच पक्षाच्या नेते राहुल गांधीसह प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी अमानवी वागणूक दिल्याने त्याचाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध करून केंद्र व राज्य सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये, सुदर्शना कौशिक, बाळासाहेब गायकवाड, सचिन नाईक, माजी नगरसेवक अंकुश सोनवणे, इंटकचे रवींद्र सावंत यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित हाेते. कार्यक्रमस्थळी अनुचित प्रकार होऊ नये म्हणून वाशी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.