नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक बुधवारी भाजपत जाहीर प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हा प्रवेश होणार आहे. मात्र, 55 पैकी 50 नगरसेवकच भाजपामध्ये प्रवेश करणार असून महापौरांसह स्थायी समिती सभापती असे पाच जण राष्ट्रवादीतच राहणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची गेली अनेक वर्षे एकहाती सत्ता आहे. नाईक यांचे समर्थक नगरसेवक आज दुपारी 1 च्या सुमारास कोकण भवनमध्ये वेगळा गट करण्याचे निवेदन देणार आहेत. यानंतर सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाईक समर्थकांनी शहरात मोठमोठे बॅनर लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींच्या सोबत फलक व बॅनरवर गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक यांची छायाचित्रे झळकत आहेत. काही फलकांवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील व जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत या स्थानिक नेत्यांनाही स्थान दिले आहे.
महापालिकेमधील सत्ता टिकविण्यासाठी महापौर, स्थायी समिती सभापती व इतर सभापती आज भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे समजते. उर्वरीत जवळपास 50 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.