नीटच्या परीक्षेत डमी बसविणाऱ्याला अटक; २० लाखांत ठरला होता व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 08:14 AM2024-07-08T08:14:02+5:302024-07-08T08:14:30+5:30
मे महिन्यात झालेल्या नीट परीक्षेत बेलापूर येथील केंद्रावर डमी विद्यार्थी बसवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई : मे महिन्यात झालेल्या नीट परीक्षेत बेलापूर येथील केंद्रावर डमी विद्यार्थी बसवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. दोन मूळ व डमी उमेदवाराच्या अटकेनंतर पोलिस शोधात होते. त्याने २० लाखात हा व्यवहार ठरवला होता अशी माहिती समोर आली आहे.
परीक्षेला बसलेली विद्यार्थिनी मयूरी पाटीलवर संशय आला होता. परीक्षा झाल्यावर तिच्याकडे चौकशी केली असता ती मयूरी पाटील नसून तिचे खरे नाव निशिका यादव असल्याचे समोर आले. ती मयूरीच्या जागी परीक्षा देण्यासाठी डमी उमेदवार म्हणून परीक्षेला बसली होती. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच निशिकाला अटक केली होती. मयूरीलादेखील अटक केली असता एकाचे नाव पुढे आले. वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक नाथ लोखंडे यांच्या पथकाने अभिषेक मौर्या (३२) ला उत्तर प्रदेशमधून अटक केली. त्याने मयूरीच्याऐवजी परीक्षा देण्यासाठी निशिकाला परीक्षेला बसवले होते.
पैसे कमवण्यासाठी पहिल्यांदाच प्रयत्न
मयूरीला नीट परीक्षेत पास करून देण्यासाठी त्यांच्यात २० लाखांचा व्यवहार ठरला होता. मात्र हे पैसे परीक्षा पास झाल्यावर त्याला दिले जाणार होते. तो बी. टेक झालेला असून त्याच्या परिचयाचे अनेकजण राजस्थानच्या कोटा भागात आहेत. त्यांच्यामार्फत त्याची निशिका सोबत ओळख झाली होती. दरम्यान उत्तर प्रदेशात परीक्षांना डमी उमेदवार बसवले जायची याची त्याला कल्पना होती. यातूनच त्याने नीट परीक्षेत डमी उमेदवार बसवून पैसे कमवण्यासाठी पहिल्यांदाच हा प्रयत्न केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र त्याने इतरही कुठे डमी उमेदवार बसवले होते का? याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.