भटक्या श्वानामुळे पोलिसांनी केला हत्येचा उलघडा; नवी मुंबईतून आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 04:21 PM2024-04-26T16:21:20+5:302024-04-26T16:21:53+5:30

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत भटक्या श्वानामुळे हत्येचा आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Navi Mumbai Crime News man who killed the youth was found because of the stray dog | भटक्या श्वानामुळे पोलिसांनी केला हत्येचा उलघडा; नवी मुंबईतून आरोपीला अटक

भटक्या श्वानामुळे पोलिसांनी केला हत्येचा उलघडा; नवी मुंबईतून आरोपीला अटक

Navi Mumbai Crime : भटक्या श्वानांमुळे होणाऱ्या त्रासामुळे अनेकजण आपला राग त्यांच्यावर व्यक्त करत असतात. अनेकदा रस्त्यावरच्या श्वानांना बेदम मारहाण देखील केली जाते. मात्र असं असलं तरी श्वान हा प्राणी पोलिसांना अनेक गुन्ह्यांची सहजपणे उकल करण्यास मदत करतो. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडला आहे.
नवी मुंबईत पोलिसांनी रस्त्यावरच्या श्वानाच्या मदतीने एक गुन्हा उघडकीस आणला आहे.

रस्त्यावरच्या श्वानाने दाखवलेल्या रस्त्यामुळे पोलिसांनी ४५ वर्षीय व्यक्तीचा हत्येचा उलघडा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी या व्यक्तीची हत्या झाली त्यावेळी भटके श्वान त्याच ठिकाणी होते. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी केवळ दोन दिवसात हत्येचा प्रकरणाचा उलघडा सोडवत आरोपीला अटक केली.

१३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. नवी मुंबईच्या नेरुळ परिसरात पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. मात्र तपासानंतरही हत्या झालेल्या व्यक्तीची आणि हल्लेखोराची ओळख पटेल असा कोणताही पुरावा तिथे आढळला नाही. त्यावेळी पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पुरावे शोधण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता हत्या झालेला तरुण आजूबाजूच्याच परिसरात कचरा वेचण्याचे काम करत होता.

पोलिसांना सुरुवातीच्या तपासात मृत तरुणाच्या डोक्यावर कोणत्यातरी जड वस्तूने प्रहार केल्याचे आढळून आले. पोलिसांना सीसीटीव्हीमध्येही मृत तरुणाच्या डोक्यावर हल्लेखोराने लोखंडी रॉडने वार केल्याचे दिसत होते. हल्ल्यानंतर तरुण बेशुद्ध पडला तर हल्लेखोराने तिथून पळ काढला. सीसीटीव्हीमध्ये आरोपीचा पुसटसा चेहरा दिसत होता.  हा सगळा प्रकार घडला त्यावेळी तिथे कोणीच उपस्थित नव्हतं. मात्र त्याच सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना रस्त्यावरील श्वान दिसला. जे पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत होते त्यांनी एक काळ्या रंगाचा श्वान घटनास्थळी दिसला होता.

श्वानाचं वागणं पोलिसांना खटकलं अन्..

घटनास्थळाच्या सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना श्वानाची वर्तणूक थोडी शंकास्पद वाटली. कारण सामन्यतः अशा घटना घडतात त्यावेळी श्वान भुंकतात किंवा आक्रमक होतात. मात्र याप्रकरणात श्वानाने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. त्यामुळे श्वान हल्लेखोराला ओळखत असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. त्यावरुन पोलिसांनी त्या श्वानाची शोधाशोध सुरु केली. बऱ्याच तपासानंतर पोलिसांना सीसीटीव्हीमधील श्वान हे नेरुळ फ्लाय ओव्हरच्या फुटपाथखाली एका व्यक्तीसोबत आढळलं.

पोलिसांनी श्वानावर ठेवली पाळत

पोलिसांनी त्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता सीसीटीव्हीतील श्वान भार्या नावाच्या एका मुलासोबत राहत असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी श्वानावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी १५ एप्रिलच्या रात्री हे श्वान आणि भार्या नावाच्या व्यक्तीसोबत फुटपाथवर झोपलेलं दिसलं, पोलिसांनी तात्काळ भार्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरु केली. पोलिसांच्या चौकशीत अखेर या प्रकरणाचा उलघडा झाला.

कशासाठी केली हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भार्याचे खरं नाव हे मनोज प्रजापती आहे. ज्या व्यक्तीची हत्या झाली ती भार्याला दररोज मारहाण करायची आणि त्याचे पैसे हिसकावून घ्यायची. या सगळ्याला कंटाळून भार्याने त्या व्यक्तीची हत्या केली. 13 एप्रिलच्या सकाळी भार्या आणि हत्या झालेल्या व्यक्तीची हाणामारी झाली होती. त्यावेळी भार्याने लोखंडी रॉडने कचरा वेचणाऱ्यावर हल्ला केला ज्यात त्याचा मृत्यू झाला.
 

Web Title: Navi Mumbai Crime News man who killed the youth was found because of the stray dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.