दिल्लीच्या सराईत गुन्हेगारांना उलवेतून अटक, नवी मुंबईत वाहनचोरी, सोनसाखळी चोरीचे गुन्हे 

By सूर्यकांत वाघमारे | Published: October 7, 2024 08:09 PM2024-10-07T20:09:41+5:302024-10-07T20:10:18+5:30

Navi Mumbai Crime News: दिल्ली पोलिसांची दमछाक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा पोलिसांनी उलवे परिसरातून अटक केली आहे. दिल्लीत गुन्हा करून आश्रयासाठी नवी मुंबईत आल्यानंतर इथेही ते वाहनचोरी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे करू लागले होते.

Navi Mumbai: Criminals arrested in Sarai of Delhi, theft of vehicles in Navi Mumbai, theft of gold chain  | दिल्लीच्या सराईत गुन्हेगारांना उलवेतून अटक, नवी मुंबईत वाहनचोरी, सोनसाखळी चोरीचे गुन्हे 

दिल्लीच्या सराईत गुन्हेगारांना उलवेतून अटक, नवी मुंबईत वाहनचोरी, सोनसाखळी चोरीचे गुन्हे 

- सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई - दिल्ली पोलिसांची दमछाक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा पोलिसांनी उलवे परिसरातून अटक केली आहे. दिल्लीत गुन्हा करून आश्रयासाठी नवी मुंबईत आल्यानंतर इथेही ते वाहनचोरी व सोनसाखळी चोरीचे गुन्हे करू लागले होते. त्यांनी केलेल्या दोन गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना हाती लागलेल्या माहितीवरून त्यांना राहत्या ठिकाणावरून अटक करण्यात आली आहे. 

शहरात घडणाऱ्या वाहनचोरी व सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासात नवी मुंबई पोलिसांच्या हाती दिल्लीचे सराईत गुन्हेगार लागले आहेत. त्यांनी गतमहिन्यात दिल्लीतील हरीनगर पोलिस ठाणे हद्दीत एक शॉप लुटले होते. मध्यरात्रीच्या सुमारास शॉपमध्ये घुसून पिस्तूलच्या धाकावर रोकड लुटली होती. त्यांच्यावर दिल्लीत ३७ पेक्षा अधिक गंभीर व वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र नवी मुंबईत दोन गुन्ह्यातच त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. वाशी, जुईनगर, कळंबोली, कामोठे, सीबीडी परिसरात मागील महिन्यात सलग मोटरसायकल चोरीचे व सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले होते. या गुन्ह्यांच्या तपासासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचे पथक केले होते. त्यात सहायक निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सतीश भोसले, नीलम पवार, शशिकांत शेंडगे, उर्मिला बोराडे, अनिल यादव, संजय राणे आदींचा समावेश होता. या पथकांनी गुन्हे घडलेल्या परिसराची पाहणी करून संशयितांची माहिती मिळवली होती. त्यात उलवे परिसरात ते राहत असल्याचे समोर आले होते. त्यावरून उलवे परिसरातील ४० ते ५० सोसायटींमधील रहिवास्यांची माहिती पोलिसांनी तपासली होती. यावेळी एका गेस्ट हाउसमध्ये सर्वजण राहत असल्याचे समोर येताच सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत ते गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होताच त्यांना अटक करण्यात आली. 

सागर मेहरा (२७), अभय नैन (१९) व शिखा मेहरा (२७) अशी त्यांची नावे आहेत. सागर व शिखा पती पत्नी असून सागर व अभय सराईत गुन्हेगार आहेत. सागरावर दिल्ली परिसरात ३७ गुन्हे दाखल असून त्यासंबंधी न्यायालयात खटले सुरु आहेत. या गुन्ह्यांमध्ये जामिनावर असतानाही तो गुन्हे करत होता. तर शॉप लुटल्यानंतर पोलिस मागावर असल्याने तो पत्नी व साथीदारासह नवी मुंबईत आला. काही दिवस कोपर खैरणेत गुन्हेगार मित्र अनुज छारी (२४) याच्याकडे राहिला होता. मात्र एका गुन्ह्यात पनवेल पोलिसांनी अनुजला अटक केल्याने ते उलवेत गेस्ट हाऊसमध्ये रहायला गेले होते. 

पत्नीमार्फत दागिन्यांची विल्हेवाट  
सागर हा दिल्ली परिसरात चोरी, लुटमारी असे गुन्हे करून चोरलेल्या ऐवजाची पत्नीमार्फत विल्हेवाट लावायचा. त्याची पत्नी शिखा हि चोरीचे दागिने सोनारांकडे जाऊन मोडीत काढण्याचे काम करायची. 

न्यालयालयाचे चार जाहीरनामे 
सागरवर दिल्लीत दाखल असलेल्या ३७ गुन्ह्यांचे खटले सुरु आहेत. मात्र जामिनावर सुटल्यानंतर तो एकदाही न्यायालयात सुनावणीला गेला नाही. तर समन्स काढून देखील तो पोलिस व न्यायालय यांना जुमानत नव्हता. यामुळे न्यायालयाने त्याच्या विरोधात चार जाहीरनामे काढले आहेत. त्यामध्ये अखेरचा पर्याय म्हणून त्याच्या संपत्तीवर कायदेशीर जप्ती आणली जाणार आहे. 
 

Web Title: Navi Mumbai: Criminals arrested in Sarai of Delhi, theft of vehicles in Navi Mumbai, theft of gold chain 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.