- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - तुर्भे जनता मार्केट येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे मोबाईल व इतर साहित्य हस्तगत केले आहे. अटक केलेल्या तिघांपैकी दोघे एपीएमसी आवारात हमालीचे काम करणारे असून एकजण चालकाची नोकरी करायचा.
तुर्भे जनता मार्केट येथील मोबाईल दुकानाचे शटर तोडून घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांच्या अनुशंघाने गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाकडून तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरु होता. त्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांनी सहायक निरीक्षक सतीश भोसले, उपनिरीक्षक राहुल भदाणे, हवालदार संजय राणे, सचिन टिके आदींची पथके केली होती. त्यामध्ये संशयित व्यक्तींची माहिती मिळवून त्यांचा शोध सुरु होता. यादरम्यान तुर्भे गावातच एक व्यक्ती मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून त्याच्या इतर दोन साथीदारांना देखील अटक करण्यात आली. सेलराज नाडर (५५), नरेशकुमार वर्मा (२७) व अनिकेत यादव (१९) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण १७ लाख १९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्यासह तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नाडर व वर्मा दोघेही एपीएमसी मार्केटमध्ये हमालीचे काम करायचे. तर रात्री जागा मिळेल त्याठिकाणी मुक्काम करायचे. तर यादव हा चालकाची नोकरी करणारा असून तो तुर्भे गावात भाड्याच्या घरात रहायला आहे. त्याच्याच घरात चोरीचा मुद्देमाल त्यांनी लपवला होता. त्यात १०१ मोबाईल, २६ इअर बर्ड व १० इतर उपकरणांचा समावेश होता. हे मोबाइलफोन ते विक्री करण्यासाठी ते खरेदीदाराच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी बांग्लादेश मध्ये देखील मध्यस्थींमार्फत प्रयत्न केला होता असेही समजते. मात्र तत्पूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.