नवी मुंबई - नेरूळच्या डी. वाय. पाटील हॉस्पिटलनजीक भीषण आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. या आगीत कॅम्पसमधील साठवलेल्या साहित्याला आग लागली असून, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून, तपास सुरू आहे. आगीतून उठलेल्या धुरामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
डी वाय पाटील प्रशासनानं एक नवीन इमारत बांधायला घेतली होती.या इमारतीच्या बांधकामासाठी आणलेल्या सामानाला आग लागल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी थर्माकॉल जास्त प्रमाणात असल्यानं आगीचा भडका उठाला होता. या आगीची तीव्रता जास्त होती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि आता आग आटोक्यात आली आहे. आग लागलेल्या इमारतीच्या काही अंतरावर मुलींचं वसतिगृह आहे. याशिवाय डी वाय पाटील स्टेडियम आणि डी वाय पाटील हॉस्पिटल देखील या इमारतीपासून काही अंतरावर आहे. या बाजूला आग पसरू नये यासाठीही अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत.