पर्यटकांसाठी ‘नवी मुंबई दर्शन’ बस सुरू होणार; राजन विचारे यांच्या मागणीला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 01:01 AM2021-03-26T01:01:15+5:302021-03-26T01:01:50+5:30
नवी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे नवी मुंबई येथील पर्यटन स्थळांना उत्तम दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मुंबईच्या धर्तीवर ‘नवी मुंबई दर्शन’ बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
नवी मुंबई : नवी मुंबई शहराचा विकास झपाट्याने होत असून अनेक विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. शहरातील नयनरम्य पर्यटन स्थळाचा लाभ घेण्यासाठी पर्यटक आकर्षित होतात. परंतु, पर्यटकांना पर्यटनस्थळे पाहण्यासाठी खाजगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. परिणामी प्रवासासाठी त्यांना जादाचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबई येथील पर्यटन स्थळांना उत्तम दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मुंबईमध्ये ज्याप्रमाणे रविवारी बस चालविली जाते त्याप्रमाणे ‘नवी मुंबई दर्शन’ बस सेवा सुरु करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. या मागणीला यश आले असून महापालिकेने याबाबतीत सकारात्मकता दाखविली आहे.
नवी मुंबई शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे, रो-रो सेवा अशी एक ना अनेक विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्यामुळे ऐरोली येथील बायो डायव्हर्सिटी पार्कही विकसित होत आहे. याच पार्श्वभूमीवर विदेशी पक्षी येथे नेहमीच स्थलांतर करत असतात. त्यांच्या स्थलांतरामुळे येथील निसर्ग सौंदर्याला नवी उभारी मिळते. घणसोली येथील गवळीदेव सुलाईदेवी या पर्यटन स्थळांचा विकास वेगाने होत आहे.
त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेकडून महापालिका क्षेत्रात तब्बल ३५० अद्ययावत उद्यान विकसित केले आहेत. तसेच येथील नव्याने होऊ घातलेल्या ज्वेलपार्कचे काम सुरु आहे. तर, पामबीचला लागून १६ किमी लांबीचा सायकल ट्रॅकही उभारण्यात येणार आहे. शहरातील अशी पर्यटन स्थळे पाहण्यासाठी खाजगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. परिणामी प्रवासासाठी त्यांना जादाचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी विचारे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे नवी मुंबई येथील पर्यटन स्थळांना उत्तम दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मुंबईच्या धर्तीवर ‘नवी मुंबई दर्शन’ बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
विचारे यांनी केलेल्या मागणीची नवी मुंबई महापालिकेने तातडीने दखल घेत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘मुंबई दर्शन’ डबलडेकर बस सेवेप्रमाणेच ‘नवी मुंबई दर्शना’ साठी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बस सेवा सुरू करण्यासाठी परिवहन उपक्रमाद्वारे पाहणी व नियोजन करून बस सेवा लवकरच सुरु केली जाणार असल्याचे कळविले आहे.
नवी मुंबई शहरात विविध सार्वजनिक सेवांचे पर्यटकांना आकर्षण व्हावे, यासाठी लवकरच ही बस सेवा सुरु झाल्यास शहरातील आणि शहराबाहेरील पर्यटकांना याचा लाभ मिळणार आहे तसेच यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. -राजन विचारे(खासदार)