नवी मुंबईतील वाशीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पाळणाघरातील महिला सेविकेनं अवघ्या १६ महिन्यांच्या चिमुकल्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आणि सर्वांना धक्का बसला. पाळणाघरातील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडीस आला.
या चिमुकलीच्या वडिलांनी वाशी येथील स्मार्ट टॉट्स येथे घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज गेल्या बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई पोलिसांसह संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करून ट्विटरवर पोस्ट केली.
“डे केअरमध्ये (स्मार्ट टॉट्स, से-28, वाशी) माझ्या १६ महिन्यांच्या बाळासोबत हे असं घडलं आहे. या महिला आणि डे केअरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला मारहाण करण्याचा कोणालाही अधिकार नाही", असं चिमुकल्याच्या वडिलांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महिलेची चिमुकल्याला बेदम मारहाणट्विट करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला चिमुकल्याला मारताना दिसते. तसंच ती चिमुकल्याला जेवण्यापासून थांबवताना दिसते आणि त्यानंतर थप्पड लगावते. पुढे इतर मुलांवरही मोठ्यानं ओरडताना ती फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे.
१३ फेब्रुवारीच्या या ट्विटला उत्तर देताना नवी मुंबई पोलिसांनी याची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात आल्याचं म्हटलं आहे. चिमुकल्याच्या वडिलांनी आता पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.