नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

By योगेश पिंगळे | Published: September 13, 2023 04:50 PM2023-09-13T16:50:46+5:302023-09-13T16:50:58+5:30

स्पर्धेत २६० हून अधिक शाळांतील ३० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

Navi Mumbai district level school sports competition started with excitement | नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

googlenewsNext

नवी मुंबई : नवी मुंबईला शालेय क्रीडा स्तरावर जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट विभाग स्तरावर व नंतर राज्य स्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळते ही आनंदाची गोष्ट असल्याचे सांगत यामधून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तर गाजविणारे नवी मुंबईकर खेळाडू पुढे येतील असा विश्वास नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला. या स्पर्धेत शहरातील सुमारे २६० हून अधिक शाळांतील ३० हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा परिषद, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ शुभारंभप्रसंगी आयुक्त नार्वेकर मनोगत व्यक्त करीत होते. सन  २००९ पासून सुरु झालेल्या नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये दरवर्षी सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून ३० हजाराहून अधिक खेळाडू ४६ क्रीडा प्रकारात सहभागी होतात हेच नवी मुंबईत खेळाचे वातावरण वाढीस लागल्याचे द्योतक आहे असे सांगत फिफाच्या अध्यक्षांनी ज्या फुटबॉल मैदानाची प्रशंसा केली अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणावर आपले नवी मुंबईतले विद्यार्थी खेळताहेत ही समाधान देणारी गोष्ट असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभाग उपायुक्तपदी आता ऑलिंपिकमध्ये भारताचे नाव गाजविणाऱ्या ललिता बाबर कार्यरत असल्याने नवी मुंबईतील क्रीडा क्षेत्राला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करीत विविध खेळांच्या विकासासाठी महानगरपालिकेच्या वतीने काय करता येईल याचा आढावा घेऊन त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आयुक्तांनी त्यांना दिल्या. याप्रसंगी स्पर्धेविषयी माहिती देताना क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त ललिता बाबर यांनी संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्राला व्यापणाऱ्या या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत २६० हून अधिक शाळांतील ३० हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होत असल्याचे सांगितले. फुटबॉल स्पर्धेपासून यावर्षीच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत असून यामध्ये १२६ मुलांचे व ७८ मुलींचे संघ सहभागी होत असल्याचे सांगत त्यांनी या फुटबॉल स्पर्धेत नवी मुंबई महापालिकेच्या पाच शाळाही सहभागी होत असल्याची माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, जिल्हास्तरीय क्रीडा समिती सदस्य पुरुषोत्तम पुजारी व धनंजय वनमाळी, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे व रेवप्पा गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

फुटबॉल सामान्याने स्पर्धेचा शुभारंभ
या स्पर्धेचा शुभारंभाचा १४ वर्षाखालील मुलांचा फुटबॉल सामना अँकरवाला स्कूल आणि सेंट मेरी स्कूल यांच्यामध्ये झाला. आयुक्तांच्या हस्ते नाणेफेक होऊन जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा प्रत्यक्ष मैदानात शुभारंभ करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल मैदानावर खेळायला मिळणार याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

Web Title: Navi Mumbai district level school sports competition started with excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.