Navi Mumbai: दबावाला बळी न पडता निर्धाराने लढत रहा, विश्वजीत पाटील यांचे आवाहन
By नामदेव मोरे | Published: February 9, 2024 01:58 PM2024-02-09T13:58:30+5:302024-02-09T14:01:22+5:30
Navi Mumbai: जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी पडू नका, निर्धाराने लढत रहा. नवी मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालले आहे. येथील अनागोंधी कारभाराविरोधात असाच आवाज उठवा असे आवाहन काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी पडू नका, निर्धाराने लढत रहा. नवी मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालले आहे. येथील अनागोंधी कारभाराविरोधात असाच आवाज उठवा असे आवाहन काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.
नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर क्रांती हक्क मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला संबोधीत करताना विश्वजीत कदम यांनी महानगरपालिकेच्या कामकाजावर हल्लाबोल केला. एकेकाळी विकासासाठी आघाडीवर असणारी महानगरपालिका भ्रष्टाचाराचे करण होत चालली आहे. काही नेतेमंडळीमुळे महानगरपालिकेची ही अवस्था झाली आहे. आरोग्य, पाणी पुरवठ्यासह नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. चुकीच्या कामकाजाविरोधात युवक काँग्रेसचे अनिकेत म्हात्रे यांनी आवाज उठविला आहे. शहरवासीयांनी त्यांना साथ द्यावी. कोणत्याही दबावाला बळी न पडता पुर्ण ताकदीने लढण्याचे आवाहनही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. देशात, राज्यात व नवी मुंबईमध्येही परिवर्तन करायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज जे आयुक्त तुम्हाला वेळ देत नाहीत ते घरी येवून तुम्ही सांगीतलेली जनहिताची कामे करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनिकेत म्हात्रे यांनी महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये योग्य उपचार मिळत नाहीत. आयुक्त पाठपुरावा करूनही वेळ देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. क्रांती हक्क मोर्चाला शहरवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रमाकांत म्हात्रे यांनीही शहरात युवक काँग्रेसच्या माध्यमातून ३६ चौक सभा झाल्या. सर्व सभांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. महानगरपालिकेत तीच तीच कामे पुन्हा पुन्हा केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. जनहिताची कामे करत नसतील तर मालमत्ता कर भरू नका असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशीक यांनी काँग्रेसने आतापर्यंत शहराच्या विकासासाठी काय कामे केली याविषयी माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक संतोष शेट्टी, अंकुश सोनावणे, रविंद्र सावंत, मंदाकिनी म्हात्रे, महिला जिल्हा अध्यक्षा पूनम पाटील, अनंत सिंग, उज्वला साळवी, नासीर हुसेन, अन्वर हवालदार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मोर्चा आढविण्यात आल्यामुळे विश्वजीत कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निषेध केला.