नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल ७३० दिवसांवर पोहोचला आहे. जानेवारी महिन्यातील सात दिवस एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाणही नियंत्रणात येऊ लागल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी चाचण्यांची संख्या कमी करण्यात आलेली नाही. रेल्वे स्टेशन्सवरही तपासणी केद्रे सुरू आहेत. जानेवारी महिन्यातही ५३७२३ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. या चाचण्यांमध्ये २००७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ३.७३ एवढा कमी झाला आहे. नोव्हेंबरमध्ये रुग्ण दुप्पट हेण्याचा कालावधी २६३ होता तो ७३० वर पोहोचला आहे. डिसेंबरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८९१ होती ती ७८९ वर आली आहे. रुग्ण कमी झाल्याने पालिकेने शहरातील १० कोविड केअर सेंटर व २ डेडिकेटेड काेविड सेंटर बंद केली आहेत. कोरोना लसीकरण अभियानही प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारपर्यंत पहिल्या ९७०३ आरोग्यकर्मींना लसीकरण झाले आहे. २ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यामध्ये असलेल्या पोलीस, सुरक्षा, स्वच्छता अशा प्रकारे अग्रभागी असणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणासही सुरुवात झालेली असून ७४२ योद्ध्यांचे लसीकरण झालेले आहे.ही लस सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यास काही अवधी लागणार असल्याने मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे व एकमेकांपासून अंतर राखणे हीच कोरोनापासून बचावाची त्रिसूत्री आहे हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने स्वत:चे व इतरांचे रक्षण करण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.१ ते ५ फेब्रुवारीपर्यंतचा तपशीलएकूण चाचण्या - १०१७६आरटीपीसीआर - ८५८०ॲन्टीजेन - १५९६रुग्ण - ३१७कोरोनामुक्त - ३२७मृत्यू - ३सक्रिय रुग्ण - ७८९
नवी मुंबई शहरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दोन वर्षांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 12:27 AM