Navi Mumbai: मराठी नजरेतून डॉ. मृण्मयी भजक यांनी घडविली अमेरिकेची खट्टी मीठी सफर
By योगेश पिंगळे | Published: January 20, 2024 05:32 PM2024-01-20T17:32:11+5:302024-01-20T17:32:32+5:30
Navi Mumbai News: मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून त्याला अधिकारी, कर्मचारी व शहरातील साहित्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई - मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून त्याला अधिकारी, कर्मचारी व शहरातील साहित्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षीच्या पंधरवड्यातील तिसरे कार्यक्रमपुष्प गुंफतांना लेखिका, निवेदिका डॉ.मृण्मयी भजक यांनी ‘अमेरिका खट्टी मीठी’ या एकपात्री सादरीकरणातून मराठी चष्म्यातून अमेरिकेचे आंबट-गोड दर्शन घडविले.
नाट्य अभिवाचन स्वरुपात दृष्क–श्राव्य माध्यमातून साकारलेल्या या कार्यक्रमातून उपस्थितांना सभागृहात बसून अमेरिकेची सफर घडली. अमेरिकेतील सेंट जोसेफ गावात निवेदिकेचे वास्तव्य्, तेथील निसर्गाच्या बदलांचे होणारे परिणाम, तिथल्या स्त्रियांच्या भावनांचे हिंदोळे, स्त्रियांना खूप मूले असण्याचा वाटणारा अभिमान, लग्नाशिवाय होणा-या संततीला स्वीकारणारा समाज, जोडीदार सोडून गेल्यानंतर आलेले एकलेपण अशा विविध भावावस्था त्यांनी उत्तम अभिनयातून व अभिवाचनातून प्रभावीपणे साकारल्या. भारतीय असण्याविषयीची अमेरिकन माणसाची ओढ व त्यातून फूल इंडियन, हाफ इंडियन ते अगदी पाव इंडियन असे भारतीयत्व सांगण्याची तेथील माणसांची असोशी माडतांनाच आपला देश सुटतो पण परदेश आपला होतो का? हे माहीत नाही असा विचार करायला लावणारा प्रश्न मागे सोडून ही अभिवाचनाची मैफल सरली. ड्रेसच्या खिशात शिल्लक राहिलेली अमेरिकेतील मिशीगन किना-यावरील पांढरी शुभ्र वाळू जरी अमेरिकन आठवणी जाग्या करत असली तरी इकडे परतल्यानंतर आपला देशच बरा अशी संवेदना अधिक तीव्रतेने जाणवते असे सांगत डॉ.मृण्मयी भजक यांनी अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण करीत अमेरिकेची जिंदादील सफर घडविली. सुप्रसिध्द साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी अमेरिका खट्टी मीठी या पुस्तकाच्या बर्ल्बमध्ये म्हटल्याप्रमाणे हे आत्मकथन अमेरिकेकडे उत्सुकतेने पाहणा-या महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय कुटूंब कन्येचे आहे याची प्रचिती देणारा कार्यक्रम डॉ. मृण्मयी भजक यांनी सादर केला.