- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई - गुन्हे शाखा व एपीएमसी पोलिसांनी कोपरी परिसरातून 1 कोटी 84 लाख 70 हजाराचे ड्रग्स जप्त केले आहे. कोपरी परिसरात नायझेरियनचे वास्त्यव्य असलेल्या ठिकाणी छापा टाकून हि कारवाई केली आहे. या कारवाईत 11 नायझेरियन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरी परिसरात चालणारे ड्रग्स विक्रीचे रॅकेट मोडीत काढणारी कारवाई पोलिसांनी केली आहे. कोपरी येथील इमारतीत मोठ्या संख्येने नायझेरियन व्यक्तींचे वास्त्यव होते. त्यांच्याकडून ड्रग्स विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व एपीएमसी पोलिस यांनी शुक्रवारी संयुक्तरित्या त्याठिकाणी छापा टाकला. वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांनी विविध पथके तयार केली होती. यामध्ये तिथल्या 11 नायझेरियन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडे एमडी, कोकेन असे तब्बल 1 कोटी 84 लाख 70 हजार रुपये किमतीचे एकूण ड्रग्स मिळून आले. डोनटाऊस चिडोक्वे (40), ओफोझोर बासिल (36), एडविन उडैस्के (32), फॅक्र नझेकवेसी (31) विनसन उक्वैग्वे (45), जेम्स कपूर (41), ओकू लेऑन (34), जॉर्ज ब्लासन (50), चार्ल्स वापोका (37), ए गुसून अलेन (32) व एनडीवे डोनाटस (39) अशी त्यांची नावे आहेत.
याप्रकरणी त्यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गतवर्षी खारघर, उलवे व वाशी परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाई नंतर शुक्रवारी मोठ्या स्वरूपात कोपरी येथे कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी तुर्भे एमआयडीसी, एपीएमसी, वाशी, कोपर खैरणे, रबाळे, रबाळे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत मिशन ऑल आऊट राबवण्यात आले होते. त्यामध्ये कोपरी परिसरात हि कारवाई करण्यात आली. त्याशिवाय 16 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून उघड्यावर मद्यपान करणाऱ्या 33 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मोटर वाहन कायद्यांतर्गत 255, अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या 13 जणांवर, कोटपा कायद्यांतर्गत 37 तर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.