- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - ड्रग्स विक्री करणाऱ्या नायझेरियन व्यक्तीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. त्याच्याकडून २५ लाख ४३ हजाराचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. तळोजा येथे भाड्याने घेतलेल्या घरात तो अमली पदार्थ विक्री करायचा.
तळोजा परिसरात एक नायझेरियन व्यक्ती अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून सहायक आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे, सहायक निरीक्षक श्रीकांत नायडू, निलेश धुमाळ, ज्ञानेश्वर बनकर, वीय पाटील,, रमेश तायडे, गणेश पवार, संजय फुलकर, अंकुश म्हात्रे आदींचे पथक केले होते. या पथकाने मंगळवारी तळोजा एकटपाडा येथील आय.जी. रेसिडेन्सी इमारतीमधील घरावर छापा टाकला. यावेळी तिथे राहणाऱ्या इफियानी इयादा (४३) याच्याकडे ३ लाख २३ हजाराचे २१.१६ ग्रॅम एमडी व २१ लाख २० हजाराचे १०६.७४ ग्रॅम कोकेन मिळून आले. सदर ठिकाणी विदेशी नागरिकाला भाड्याच्या घरात आश्रय दिल्याची माहिती घरमालक व एजंट यांनी पोलिसांपासून लपवली होती. याप्रकरणी त्या दोघांवर देखील तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. a