नवी मुंबई : विश्वास संपादित करून व्यापाऱ्याचा ४५ लाख ८३ हजाराचा ड्रायफूड फस्त केल्याची घटना समोर आली आहे. एपीएमसी मधील व्यापाऱ्यासोबत हा प्रकार घडला असून याप्रकरणी दलालासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एपीएमसी मसाला मार्केट मधील व्यापारी किशोर मोदींसोबत हा प्रकार घडला आहे. त्यांचा ड्रायफूड विक्रीचा व्यवसाय असून त्यातून दलाल घनश्याम दास तलाविया याच्यासोबत ओळख झाली होती. त्याने सुरवातीला मोदींकडून उधारीवर माल घेऊन वेळच्या वेळी त्याच्या बिलाची रक्कम देऊन विश्वास संपादित केला होता. यानंतर मात्र त्याने गोव्याच्या कंपनीला मोठ्या प्रमाणात ड्रायफूड हवे असल्याचे सांगून त्यांनाही एपीएमसी मार्केटमध्ये घेऊन मोदींसोबत बैठक केली होती.
त्यानंतर त्याला मागणीप्रमाणे माल दिला जात होता. मात्र प्रत्येक वेळी बिलाची रक्कम नंतर देतो असे त्याच्याकडून सांगितले जात होते. यादरम्यान काही वेळेला मोदींनी इतर व्यापाऱ्यांकडून देखील माल घेऊन त्याला दिलेला होता. मात्र काही दिवसांपासून त्याचा संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरून त्यांनी घनश्यामदास तलाविया याच्यासह मेहुल कथारिया व विपुल त्रपासिया विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावरून बुधवारी रात्री तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.