नवी मुंबई - फेसबुकवर झालेल्या ओळखीतून त्याला साडेपाच लाखाची मदत करणाऱ्या महिलेची ५४ लाखाची फसवणूक झाली आहे. मदत म्हणून घेतलेल्या पैशाची ६ पटीने परतफेड करण्याच्या बहाण्याने हि फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐरोली येथे राहणाऱ्या महिलेची फेसबुकवर लुकास इथन नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. सदर व्यक्तीनॆ आपण युके मध्ये असल्याचे महिलेला सांगितले होते. त्यानुसार या महिलेने देखील तिला विदेशात नोकरी करण्याची इच्छा असल्याचे त्याला सांगितले होते. दोघांमध्ये फेसबुकवर अनेक दिवस चॅटिंग सुरु होते. काही दिवसांपूर्वी लुकास याने आपण फिरण्यासाठी इंडोनेशिया मध्ये आलो असून आपले कार्ड बंद पडल्याचे सांगितले. यामुळे तिच्याकडे पैशाची मदत मागितली होती. यावेळी सदर महिलेने केवळ फेसबुकवर चॅटिंगद्वारे असलेल्या ओळखीतून त्या व्यक्तीच्या खात्यावर साडेपाच लाख रुपये पाठवले होते.
त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला मदतीच्या बदल्यात ३२ लाख रुपये पाठवले असल्याचे सांगितले होते. यानुसार हे पैसे मिळवण्यासाठी त्यांना टॅक्स स्वरूपात साडेतीन लाख रुपये भरावे लागतील असे एका महिलेने फोनवर सांगितले होते. तिच्यावर विश्वास ठेवून ऐरोलीतल्या महिलेने तब्बल ५० लाख रुपये वेगवेगळ्या खात्यावर पाठवले. त्यानंतरही पैशाची मागणी होऊ लागल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी तिने नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली होती. त्याद्वारे गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.