नेरूळमध्ये आजपासून नवी मुंबई उत्सव
By admin | Published: December 23, 2016 03:30 AM2016-12-23T03:30:09+5:302016-12-23T03:30:09+5:30
नेरूळ येथील आजपासून एफवायआय नवी मुंबई उत्सवाला प्रारंभ होत आहे. एनकोर इनोव्हॅटिव्ह मीडियाच्या माध्यमातून
नवी मुंबई : नेरूळ येथील आजपासून एफवायआय नवी मुंबई उत्सवाला प्रारंभ होत आहे. एनकोर इनोव्हॅटिव्ह मीडियाच्या माध्यमातून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी रंगतदार क्रिकेट सामने होणार आहेत. यात पोलीस, राजकारणी आणि शहरातील सेलिब्रेटींचे संघ सहभागी होणार आहेत. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
इव्हेंट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एनकोर इनोव्हेटिव्ह मीडिया या संस्थेच्या वतीने शहरात प्रथमच अशाप्रकारचा उत्सव भरविण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध संघात क्रिकेट सामने होणार आहेत. हे सामने दोन गटांत खेळविले जाणार आहेत. ‘अ’ गटातील एफवायआय सेलिबे्रटी आणि पोलीस पँथर यांच्यादरम्यान पहिला सामना होणार आहे. तर ‘ब’ गटातून राजकीय पुढाऱ्यांच्या संघाची लढत एफवायआय वॉरियर्सच्या संघाबरोबर होणार आहे. नवी मुंबईच्या इतिहासात प्रथमच राजकीय पुढाऱ्यांचा संघ क्रिकेटच्या मैदानात उतरणार असल्याने हे सामने पाहणे रोमांचकारी ठरणार आहे.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एनकोअर इनोव्हेटिव्ह मीडियाचे प्रमुख गौतम आगा यांच्या कल्पकतेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण मैदानावर २३ डिसेंबर रोजी सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या उत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)