नवी मुंबई : मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात, विमानतळाच्या पार्श्वभूमीवर कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:32 AM2018-02-26T01:32:17+5:302018-02-26T01:32:17+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम मार्गी लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन झाले.

Navi Mumbai: In the first phase of the metro, work momentum on the back of the airport | नवी मुंबई : मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात, विमानतळाच्या पार्श्वभूमीवर कामाला गती

नवी मुंबई : मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात, विमानतळाच्या पार्श्वभूमीवर कामाला गती

Next

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम मार्गी लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. असे असले तरी विमानतळाच्या अनुषंगाने दळणवळणाच्या सक्षम सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिडकोने आता आपले लक्ष रखडलेल्या मेट्रो प्रकल्पावर केंद्रित केले आहे. मेट्रोचा पहिला टप्पासुद्धा निर्धारित वेळेत म्हणजेच सप्टेंबर २०१८मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला.
सिडकोने २०११मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत पूर्ण होणारा हा मेट्रो प्रकल्प २१.४५ कि.मी. लांबीचा आहे. या मार्गावर एकूण १९ स्थानके असणार आहेत. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. तांत्रिक बाबीमुळे रखडलेला या पहिल्या टप्प्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सप्टेंबर २०१८मध्ये या मार्गावर मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी चिनी बनावटीच्या मेट्रो खरेदी करण्यात आल्या आहेत. सध्या या मेट्रो कोचचे ट्रायल सुरू आहे. मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात दिसू लागल्याने सिडकोने आता दुसºया टप्प्याचीही चाचपणी सुरू केली आहे.
दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. विशेष म्हणजे, या मार्गाच्या एकूण लांबीपैकी तीन ते चार कि.मी.चा मार्ग एमआयडीसी क्षेत्रातून जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसीकडून जमीन प्राप्त होणे गरजेचे आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
विविध तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेल्या नवी मुंबईचा ‘मेट्रो’ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्यातील ११ कि.मी. लांबीच्या मार्गावर चिनी बनावटीच्या मेट्रो धावणार आहे. त्याबाबत चिनी कंपनीबरोबर सिडकोने करार केला असून ३२0 कोटी रूपये किमतीच्या आठ मेट्रोची आयात केली जाणार आहे. त्यातील दोन मेट्रो सिडकोच्या ताफ्यात यापूर्वीच दाखल झाल्या आहेत.
मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबर
2018
पर्यंत पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार आहे.
११ कि.मी. लांबीच्या या मार्गासाठी सुरुवातीच्या काळात दोन हजार कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला होता. दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे.
तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर
मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी तिसरा
टप्पा सुरू करण्यात येणार आहे.
हा टप्पा केवळ दोन कि.मी. लांबीचा असून, त्यासाठी ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे; परंतु पहिलाच टप्पा चार वर्षे रखडल्याने उर्वरित तीन टप्प्यांचे कामही लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात वाढ होणार आहे.

Web Title: Navi Mumbai: In the first phase of the metro, work momentum on the back of the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.