नवी मुंबई : स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. मागच्या सरकारच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प २० वर्षे रखडला; परंतु आम्ही सत्तेवर येताच हा प्रश्न मार्गी लावला, असे सांगत २०१९ साली या विमानतळावरून पहिले विमान उड्डाण होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पायाभरणी आणि जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी उलवे येथे झाले. या प्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूनक व नौकानयनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पी. अशोक गजपती राजू उपस्थित होते. येत्या काळात देशातील बंदर विकास आणि जहाज बांधणीला प्राधान्य दिले जाणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.देशात आतापर्यंत एव्हिएशन पॉलिसी नव्हती. ती पॉलिसी आमच्या सरकारने तयार केली आहे. याअंतर्गत देशभरात आता लहान-मोठ्या १०० विमानतळांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी ९०० नवीन विमाने खरेदी केली जाणार आहेत.पायात हवाई चप्पल घालणाºया सर्वसामान्य नागरिकालाही हवाई सफारी करता यावी, हे सरकारचे धोरण असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी या वेळी व्यक्त केले. वीस वर्षे रखडलेला विमानतळ प्रकल्प केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे मार्गी लागला. असे असले तरी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे योगदान मोठे असल्याचे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
२०१९ साली नवी मुंबईतून होणार विमान उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 4:16 AM