अखेर, स्वतः राज ठाकरेंनीच तयारीचे संकेत दिले आणि मनसैनिकांचे डोळेच चमकले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 12:34 AM2020-02-24T00:34:36+5:302020-02-24T18:16:25+5:30

महापालिका निवडणूक लढविण्याचे राज ठाकरे यांचे संकेत

Navi Mumbai is flourishing after the hopes of the people | अखेर, स्वतः राज ठाकरेंनीच तयारीचे संकेत दिले आणि मनसैनिकांचे डोळेच चमकले!

अखेर, स्वतः राज ठाकरेंनीच तयारीचे संकेत दिले आणि मनसैनिकांचे डोळेच चमकले!

Next

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत मनसे रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. सानपाडा येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्र महोत्सव प्रसंगी ते उपस्थित होते. या वेळी पालिका निवडणूक कालावधीत नवी मुंबईत आपली तोफ डागणार असल्याचे ठाकरे यांनी संकेत दिले. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मनसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे उमेदवार उतरवणार असल्यावर राज ठाकरे यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निवडणूक काळात शहरात आपली सभा लागल्यास राजकीय भाष्य करू, असे वक्तव्य त्यांनी सानपाडा येथे केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष स्थापनेपासून नवी मुंबईतील मनसैनिक पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. परंतु पक्षाकडून निवडणूक लढवत असल्याची अधिकृत घोषणा होत नसल्याने त्यांचा हिरमोड होत होता. पर्यायी नाराज मनसैनिकांकडून बंडखोरी करून निवडणूक लढवली जात होती. तर मागील दहा वर्षांत अनेकांनी पक्ष निवडणूक लढवत नसल्याच्या कारणावरून पक्षांतर केले आहे.

काही महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारच्या गळतीला नवी मुंबईत सुरुवात झाली होती. परंतु शहर अध्यक्ष गजानन काळे व पक्षाच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या हालचालीमुळे ही गळती थांबली होती. अशातच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीच महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात सभा होणार असल्याचे संकेत दिल्याने मनसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी जनविकास प्रबोधिनी या संस्थेमार्फत सानपाडा येथे पश्चिम महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यास राज ठाकरे यांनी शनिवारी उपस्थिती दर्शवली होती. या वेळी आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आदी उपस्थित होते. सदर महोत्सवादरम्यान पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण, कुस्त्यांचे जंगी सामने यासह शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Navi Mumbai is flourishing after the hopes of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.