नवी मुंबई - कंपनीच्या सुरक्षारक्षकांना बांधून दिड लाखाच्या साहित्यांची चोरी केल्याची घटना महापे एमआयडीसीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चौघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
महापे एमआयडीसी मधील सुपर स्टीम बॉयलर या कंपनीत हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री कंपनी बंद असताना दोन सुरक्षारक्षक त्याठिकाणी बंदोबस्तावर होते. यावेळी कंपनीच्या मागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून चौघे चोरटे आतमध्ये घुसले. त्यांनी सुरक्षारक्षकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून बांधून ठेवले. त्यानंतर सुमारे दोन तास चोरटे कंपनीत साहित्य जमा करत होते. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ते कंपनीतून सुमारे दिड लाखाचे साहित्य घेऊन पळून गेले. सोमवारी सकाळी सुरक्षारक्षकांनी या घटनेची माहिती कंपनीच्या मालकांना फोनवरून दिली. त्यानुसार कंपनीतले सीसीटीव्ही तपासले असता अज्ञात चौघे चोरी करताना दिसून आले. त्यानुसार याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.