नवी मुंबई - पामबीच मार्गावर चार वाहनांचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रस्त्यावर सुरु असलेल्या कामामुळे दुचाकीस्वाराने ब्रेक दाबताच पाठीमागून येणारी भरधाव वाहने एकमेकांना धडकून हा अपघात घडला.
पामबीच मार्गावर नेरुळ येथे बेलापूरकडे जाणाऱ्या लेनवर रात्री १२ च्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्यावर सुरु असलेले काम दुचाकीस्वाराच्या नजरेस पडले असता त्याने अपघात टाळण्यासाठी तातडीने ब्रेक दाबला. यावेळी पाठीमागून भरधाव रिक्षा, मोटरसायकल व कार एकमेकांना धडकल्या. त्यात कारच्या धडकेने तीनही वाहनांचे मोठे नुकसान होऊन रिक्षा चालक रिक्षात अडकला होता. तर दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस व नेरुळ पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतला. त्यांनी प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने रिक्षा चालकाला रिक्षातून बाहेर काढून दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातामध्ये थोडक्यात जीवितहानी टळली आहे. पामबीच मार्गावर सर्रास वेगमर्यादा ओलांडली जात असल्याने असे अपघात घडत आहेत. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा पर्यंत जखमींचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.