अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता सुरू असलेला भराव त्याचबरोबर टेकडी उत्खननाचे काम गुरुवारी चार गावातील ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. ठेकेदारांना गुलाबपुष्प आणि सिडको अधिकाºयांना निवेदन देवून शांततेच्या मार्गाने प्रकल्पबाधितांनी आंदोलन केले.जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत कामे सुरू करू न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. विमानतळामुळे बाधित होणाºया दहा गावांतील ग्रामस्थांना सिडकोकडून वेगवेगळी आश्वासने देण्यात आली होती. वारंवार झालेल्या बैठकीत बहुतांशी गोष्टी मान्य करण्यात आल्या होत्या. त्यांची पूर्तता झाल्यानंतरच विमानतळाचे काम हाती घेण्याचे ठरले होते. संबंधित गावांचे पुनर्वसन न करतात आजूबाजूच्या जागेवर भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर उलवे टेकडी फोडण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले होते. याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना पूर्वकल्पना देण्यात आली नाही त्यामुळे तरघर, कोंबडभुजे, ओवळे, गणेशपुरी येथील ग्रामस्थांनी एकत्र येवून हे कामे बंद पाडण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार गुरुवारी उलवे येथील मंदिरात मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त जमले. पुनर्वसनाबाबत सिडको उदासीन दिसून येत आहे. त्याचबरोबर विमानतळाचे काम मात्र वेगाने केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांनी आमचा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु जी आश्वासने सिडकोने दिले आहेत त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. जोपर्यंत येथील ग्रामस्थांचे समाधान होत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही विवेक पाटील यांनी दिली. राजेंद्र पाटील यांनी ठेकेदार नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. तुम्ही ठेकेदार नेमताना आधी प्रकल्पग्रस्तांचा विचार करा, अशा शब्दात त्यांनी संबंधित नेत्यांना सुनावले.
नवी मुंबई: चार गावांनी केले विमानतळाचे काम बंद: मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कामाला विरोधच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 2:43 AM