नवी मुंबई : विमानतळाच्या कामात फसवणूक, प्रकल्पग्रस्तांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 03:06 AM2017-10-11T03:06:13+5:302017-10-11T03:06:25+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. या वेळी देण्यात आलेल्या पॅकेजमध्ये पन्नास टक्के कामे प्रकल्पबाधितांना देण्यात येणार
अरूणकुमार मेहत्रे
कळंबोली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. या वेळी देण्यात आलेल्या पॅकेजमध्ये पन्नास टक्के कामे प्रकल्पबाधितांना देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु ग्रामस्थ आजही याबाबत अनभिज्ञ आहेत. किती कोटी रुपयांचे काम आहे ते कोण करीत आहे, याबाबत त्यांना काहीच माहिती नाही. यामुळे कोंबडभुजे प्रकल्पबाधितांमध्ये नाराजीचा सूर आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित होणाºयांकरिता शासनाने पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये स्थलांतरित होणाºया १० गावांमधील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या स्वत: राहत असलेल्या घराच्या पाया क्षेत्राच्या तिप्पट क्षेत्राचा विकसित भूखंड देणे, शेतकºयांना साडेबावीस टक्के विकसित भूखंड देण्याचे सिडकोने कबुल केले आहे. त्याचबरोबर भरावाचे पन्नास टक्के कामे स्थानिक प्रकल्पबाधितांना देण्याचे जाहीर करण्यात आले होते.
सिडकोने चार ते पाच ठिकाणी विमानतळाच्या कामाला सुरुवात केली आहे. वास्तविक आधी पुनर्वसन आणि नंतर काम सुरू करण्याचे ठरले होते; परंतु सिडकोने आधी गाभा क्षेत्राचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर दुय्यम कामेही काही महिन्यांपासून सुरू आहेत. ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. तिथे अद्याप पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. त्याकडे दुर्लक्ष करून सिडको विमानतळाच्या कामाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मागील आठवड्यात प्रकल्पग्रस्तांनी घाईघाईने करण्यात आलेल्या भूमिपूजनाला विरोध केला. त्याचबरोबर रविवारी चार गावांतील ग्रामस्थ एकत्र आले आणि जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत विमानतळाच्या कामाला विरोध करायचा निर्णय त्यांनी घेतला.
कोंबडभुजे गावच्या हद्दीत तीन ते चार ठिकाणी विमानतळाला पूरक कामे सुरू आहेत. ग्रामस्थांना ही कामे किती कोटींची आहेत, ती कोणाला देण्यात आलेली आहेत, याबाबत काहीच माहिती नसल्याचे सुरेश भगत यांनी सांगितले. यापैकी पन्नास टक्के कामे सिडकोने नियमानुसार आम्हाला देणे बंधनकारक आहे. सिडको आणि लागेबांधे असल्याने विमानतळ बाधितांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे.
वातावरण चिघळण्याची शक्यता
कोंबडभुजे, तरघर, उलवे, गणेशपुरी या चार गावांनी एकत्रित गुरूवारी विमानतळाच्या कामांना त्या ठिकाणी जाऊन विरोध करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमण्याची शक्यता आहे. या वेळी विमानतळबाधींचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला जाणार आहे.