Navi Mumbai: खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी
By नारायण जाधव | Published: November 21, 2022 02:21 PM2022-11-21T14:21:34+5:302022-11-21T14:22:08+5:30
Navi Mumbai: रिक्षाचालकांमधील आरोग्य समस्या जाणून घेत योग्य मार्गदर्शनाकरिता नवी मुंबईच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्सने पुढाकार घेत शुक्रवारपासून ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
नवी मुंबई : उपजीवीकेसाठी दिवस तसेच रात्रपाळी करुन रिक्षा आणि टॅक्सी चालक अथक परिश्रम घेत असतात आणि अशावेळी आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. या चालकांमधील आरोग्य समस्या जाणून घेत योग्य मार्गदर्शनाकरिता नवी मुंबईच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्सने पुढाकार घेत शुक्रवारपासून ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या शिबिरात नवी मुंबईतील ४०० हून अधिक ऑटोरिक्षा आणि २०० टॅक्सी चालकांना निदान आणि सल्लामसलत यासह आरोग्य सेवा पुरवणार आहे.
शुक्रवारी नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे डॉक्टर्स तसेच ऑटोरिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर युनियनच्या मान्यवरांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मेडिकव्हर हॉस्पिटलने नवी मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांना मोफत आरोग्य तपासणी कूपन्सचे वाटप केले.
रुग्णालयातच मोफत आरोग्य तपासणी केली जाणार असून ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना कूपन आणि नोंदणीनुसार भेटीची वेळ रुग्णालयामार्फत दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांना कामाच्या वेळेत फार वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. आरोग्य शिबिरादरम्यान सीबीसी, रक्तातील साखर, ईसीजी, सीरम कोलेस्टेरॉल आणि सीरम क्रिएटिनिन यासारख्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. चाचण्यांसोबतच डॉक्टरांचा सल्ला सेवा देखील प्रदान करत आहे.
डॉ. सचिन गडकरी, मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख सांगतात की, रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे काम तणावपूर्ण आहे. दीर्घकाळ बसून राहणे, दूषित हवेशी सततचा संपर्क आणि कामाचे वेळापत्रक यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांच्या आरोग्य समस्यांचे मूल्यांकन करणे आणि रोगाचे प्रारंभिक टप्प्यावर निदान करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यामाध्यमातून सर्व ऑटो आणि टॅक्सी चालकांना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची आणि निरोगी आयुष्य जगण्याची ही एक चांगली संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मोफत आरोग्य तपासणीच्या नोंदणीकरिता
या शिबिराची अधिक माहिती व नोंदणीसाठी ०४० ६८३३४४५५ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा फक्त नवी मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी उपलब्ध आहे. नोंदणीसाठी ओळखपत्र आणि वाहन चालविण्याचा परवाना अनिवार्य आहे.