- कमलाकर कांबळेनवी मुंबई - गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. परंतु, गणेशोत्सव मंडळांना वीजजोडणी घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेवून गणेशोत्सव मंडळांना वाजवी दरात ४८ तासांत वीजजोडणी द्या. त्यांना वीजेचे निवासी दर लावू नयेत, असे निर्देश ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नवी मुंबईतील पाणीप्रश्न आणि वीज समस्येवर गणेश नाईक यांनी सोमवारी दोन स्वतंत्र बैठका घेतल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी नवी मुंबईतील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. अनेक भागात उघड्या डीपी आहेत. धोकादायक पद्धतीने उच्च दाबाच्या वीजवाहिन्या वरून गेल्या आहेत. केबल जळण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विजेच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. या बैठकीला शहरातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारीही उपस्थित होते. गणेशोत्सव मंडळांना ४८ तासांत वीज जोडण्या दिल्या जाव्यात, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले आहे.
नवी मुंबईचा पाणी कोटा कोणी कमी केलापाणीप्रश्नावर महापालिकेबरोबर झालेल्या दुसऱ्या बैठकीत नाईक यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. शहराच्या अनेक भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. महापालिकेच्या जलवाहिन्यांवरून अन्य घटकांना बेकायदा पाणी दिले जात आहे. एमआयडीसीने नवी मुंबईच्या कोट्याचे पाणी कमी केल्याचे स्पष्ट करून कोणाच्या सांगण्यावरून नवी मुंबईचे हक्काचे पाणी अन्य घटकांना दिले जात आहे, असा सवाल केला. महापालिका प्रशासनाच्या गलथानपण कारभारामुळे हा प्रकार घडत आहे.त्यामुळे जनतेचा उद्रेक होण्यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.
बैठकीला यांची होती उपस्थितीया बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदीसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. महावितरणच्या वतीने अधीक्षक अभियंता सिंहजी गायकवाड आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी तर महापालिकेच्या वतीने अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील आणि इतर वरिष्ठ सहकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.