नवी मुंबईमध्ये १२ वर्षांतील विक्रमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:43 PM2019-09-17T23:43:26+5:302019-09-17T23:43:38+5:30

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये या वर्षी ४१३७ मिलीमीटर एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

Navi Mumbai has 4 years of record rainfall | नवी मुंबईमध्ये १२ वर्षांतील विक्रमी पाऊस

नवी मुंबईमध्ये १२ वर्षांतील विक्रमी पाऊस

Next

योगेश पिंगळे
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये या वर्षी ४१३७ मिलीमीटर एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी पेक्षा जवळपास दुप्पट पाऊस पडला असून, सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे व सततच्या वाहतूककोंडीमुळे वाहतूकदार व प्रवासी त्रस्त झाले आहेत. एपीएमसी व इतर ठिकाणी कष्टाची कामे करणारेही त्रस्त झाले आहेत.
नवी मुंबईमध्ये जून अखेरपासून नियमित पाऊस सुरू झाला असून सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप पाऊस थांबलेला नाही. मंगळवारी पडलेल्या पावसामुळेही ठाणे-बेलापूर रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे या रोडवर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. शहरात इतर रोडवरही खड्ड्यांमुुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले होते. सानपाडा भुयारमार्गाजवळची परिस्थितीही गंभीर झाली होती. येथे रोडवर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे ते बुजविणेही शक्य होत नाही. या वर्षी शहरात ३० पेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचले होते. २००५ नंतर प्रथमच एमआयडीसीमधील वसाहतींमध्ये पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी पूर्ण वर्षभरात २६३६ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी तब्बल ४१३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त वृक्ष कोसळले असून, शॉर्टसर्किट व इतर घटनाही वाढल्या आहेत.
पाऊस थांबत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजार समितीमध्ये मालाची चढ-उतार करणाऱ्या कामगारांनाही काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फेरीवाले, मार्केटिंग व इतर काम करणारे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. प्रवास करतानाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तीन महिन्यांपासून रेल्वेसेवाही अनेक वेळा विस्कळीत झाली आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नाही. बस व इतर वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना खड्डे व वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहने नादुरुस्त होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. रिक्षा, दुचाकी व इतर वाहनांमध्ये वारंवार बिघाड निर्माण होत आहे. गॅरेजसमोर वाहने उभी करण्यासही जागा उपलब्ध नाही.
>अपघाताचे प्रमाणही वाढले
पाऊस सुरू झाल्यापासून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. पनवेलमध्ये नदीमध्ये वाहून गेल्यामुळे तीन ते चार जणांना जीव गमवावा लागला आहे. पांडवकडा धबधब्यामध्ये चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर व इतर ठिकाणी झालेल्या अपघातामध्येही अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रोड व इतर ठिकाणी रोज अपघात होत आहेत. पाऊस थांबत नसल्यामुळे खड्डेही बुजविण्याच्या कामातही अडथळे निर्माण होऊ लागले आहेत.

 


>वर्षनिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी 
२००७ २४४८.००
२००८ २३१७.२८
२००९ १६७०.१७
१०१० २३६३.४३
२०११ २६१०.६३
२०१२ २२५२.५९
२०१३ ३३३७.२८
२०१४ २५८३.५२
२०१५ १६०१.१४
२०१६ २७०६.४२
२०१७ ३०८८.२४
२०१८ २६३६.७८
२०१९ ४१३७.०३
(११ सप्टेंबर २०१९ पर्यंत)
>मोरबे धरण परिसर पाऊस
वर्ष पाऊस धरण पातळी
२००४ ३१७४.३४ ७२.००
२००५ ४४६६.११ ७९.६०
२००६ ४२९७.८० ८४.१८
२००७ ३३४३.८० ८७.२५
२००८ ३५७४.०० ८८.००
२००९ २४२६.२० ८४.७५
२०१० ३५५८.०० ८७.३५
२०११ ३८३६.०० ८८.००
२०१२ २९१६.४० ८४.६३
२०१३ ३९८४.३० ८८.००
२०१४ ३१३८.२० ८७.४५
२०१५ २२००.२० ७९.५१
२०१६ ३३२८.२० ८५.६०
२०१७ ४१३९.०० ८८.००
२०१८ ३२३८.२० ८८.००
२०१९ ४८२१.०० ८७.७५
(१७ सप्टेंबर २०१९ पर्यंत)
पाऊस (मि.मी.) पातळी (मीटर)
>सततच्या पावसामुळे रिक्षाचालकही त्रस्त झाले आहेत. पावसात भिजल्यामुळे अनेक चालक आजारी पडत आहेत. वाहने नादुरुस्तीचे प्रमाणही वाढले आहे.
- पद्माकर मेहेर, अध्यक्ष,
नेरुळ विभाग रिक्षाचालक-मालक कल्याणकारी संस्था

Web Title: Navi Mumbai has 4 years of record rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.